दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 07:38 PM2018-05-27T19:38:55+5:302018-05-27T19:38:55+5:30

अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला.

US warships sail near disputed islands in South China Sea, officials say | दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौकांना पाहून चीनचा संताप, दिला गंभीर इशारा

Next

बीजिंग- अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला. चीननं रविवारी अमेरिकेच्या दोन युद्धनौकांना दक्षिण चिनी समुद्रात पाहिलं असल्याचा दावा केला. चीन दावा करत असलेल्या क्षेत्रातून अमेरिकेच्या युद्धनौकांनी प्रवास केल्यानं चीनला संताप अनावर झालाय. परंतु अमेरिकेला या कृत्याचा उत्तर कोरिया प्रकरणात फटका बसू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून चीन दावा करत असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं युद्धनौका उतरवून चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचीही चर्चा आहे. समुद्री क्षेत्रात चीन करत असलेल्या दादागिरीला जरब बसवण्यासाठीच अमेरिकेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या युद्धनौकांमध्ये अण्वस्त्र नाशक आणि अण्वस्त्रवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. अमेरिकेनं स्वतःच्या नौदलाचा महत्त्वाच्या भाग असलेल्या या नौका दक्षिण चिनी समुद्रात उतरवल्यानं चीनसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या युद्धनौका चीनच्या आयलंडपासून अवघ्या 12 नॉटिकल लांब आहेत. या क्षेत्रावरून चीनचा शेजारील राष्ट्रांशी वादही सुरू आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांच्याशी अमेरिकेची चर्चा रद्द झाल्यानं अमेरिका आणि चीनच्या संबंधात कटुता आलीय.

अशातच अमेरिकेच्या युद्धनौकांनी चीनच्या समुद्रात प्रवेश करणं हे तणावपूर्ण स्थितीला निमंत्रण देण्यासारखाच प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही दक्षिण चिनी समुद्रातील याच वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनला संताप अनावर झाला होता. त्यावेळी अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला होता. तसेच चीनच्या वाढत्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी एकेकाळचे कट्टर वैरी असलेले अमेरिका आणि व्हिएतनाम हे दोन देश जुनं शत्रुत्व विसरून एकत्र आले होते.

दक्षिण चीन सागरासंबंधी आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय मान्य करायला चीन तयार नसून संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क सांगत आहे. या समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे चीनला या भागात जास्त रस आहे.  इथे चीनने अनेक कृत्रिम बेटे उभारली आहेत. त्यामुळे व्हिएतनामच्या राष्ट्रीय हिताला धोका निर्माण झाला आहे. चीन एक प्रकारे पश्चिम पॅसिफिक सागरातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. त्यामुळे अमेरिकेने या भागातील सक्रियता वाढवली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट ही या दोन देशातील वैरत्वाची भावना संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. चीनचा धोका ओळखून दोन्ही देशांनी संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. 

Web Title: US warships sail near disputed islands in South China Sea, officials say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.