जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:32 IST2025-12-02T12:30:38+5:302025-12-02T12:32:32+5:30
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खुद्द राष्ट्रपतींनी थेट इशारा दिला आहे. जर लवकरच पाऊस झाला नाही, तर देशाच्या राजधानीतील लोकांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी विस्थापित करावे लागू शकते.

जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
इराण या देशात सध्या पाण्याची अशी गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्याची कल्पना करणेही कठीण आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खुद्द राष्ट्रपतींनी थेट इशारा दिला आहे. जर लवकरच पाऊस झाला नाही, तर देशाच्या राजधानीतील लोकांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी विस्थापित करावे लागू शकते. राजधानी तेहरानची लोकसंख्या जवळपास दीड कोटी असल्याने सगळ्यांवर परिणाम होणार आहे.
कोरडे पडलेले जलाशय, पाण्यासाठी तळमळणारी राजधानी आणि आकाशाकडे पाहत असलेले लोक हे दृश्य आहे इराणमधील.. इराण सध्या ज्या जलसंकटातून जात आहे, त्याची तीव्रता ऐकूनच परिस्थिती किती भयानक आहे, याची कल्पना येते. पाण्याची कमतरता इतकी वाढली आहे की, राष्ट्रपतींना सार्वजनिकरित्या येऊन लोकांना इशारा द्यावा लागला आहे की, जर लवकर पाऊस झाला नाही, तर राजधानीतून नागरिकांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
हे संकट केवळ तेहरानपुरते मर्यादित नाही. देशातील २० हून अधिक प्रांतांमध्ये महिन्यांपासून पाण्याचा थेंबही नाही. शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत, तलाव गायब झाले आहेत आणि अनेक शहरांमध्ये लोक बादल्या घेऊन तासन्तास पाण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे संकट केवळ एक-दोन वर्षांचे नाही, तर अनेक पिढ्यांवर याचा परिणाम होईल.
राजधानीत सर्वाधिक वाईट अवस्था
सीएनएनच्या एका वृत्तानुसार, सुमारे १.५ कोटी लोकसंख्या असलेली देशाची राजधानी तेहरान सर्वात भीषण संकटाचा सामना करत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य जलाशय फक्त ११% भरलेले आहेत. शहराजवळील एक मोठे धरण केवळ ९% क्षमतेवर आले आहे. दुसरे महत्त्वाचे धरण ८% क्षमतेवर पोहोचले आहे, जो पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत धोकादायक स्तर आहे. अनेक भागांमध्ये नळांना तासन्तास पाणी येत नाही. सरकारने अधिकृतपणे पाणी जपून वापरण्याची घोषणा केलेली नाही, परंतु लोक सतत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करत आहेत.
६ वर्षांपासूनचा दुष्काळ, आतापर्यंतचे सर्वात वाईट संकट!
इराण गेल्या सहा वर्षांपासून सततच्या दुष्काळाचा सामना करत आहे. तज्ज्ञांच्या मते, हा दुष्काळ केवळ दीर्घकाळ टिकणारा नाही, तर त्याची तीव्रताही अभूतपूर्व आहे. कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. त्यातच हवामान बदलाने जणू आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
जलसंकट इतकं मोठं कसं झालं?
जलतज्ज्ञांच्या मते, ही पाण्याची समस्या अचानक निर्माण झालेली नाही. यामागे अनेक दशकांपासूनची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. नद्यांवर जास्त धरणे बांधणे, भूजलाचा अंदाधुंद वापर, जुन्या आणि गळक्या पाईपलाईन, जास्त पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा विस्तार, पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोरणे ही महत्त्वाची कारणे आहेत. देशात सुमारे ९०% पाणी शेतीसाठी वापरले जाते. तांदळासारखी जास्त पाणी लागणारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, ज्यामुळे भूजलाची पातळी सातत्याने खालावत आहे.
सरोवरे कोरडी, नद्या गायब!
एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असलेले प्रमुख सरोवर आता जवळजवळ पूर्णपणे कोरडे पडले आहे. तज्ज्ञ याला 'वॉटर बँकक्रप्सी' म्हणजेच जल-दिवाळखोरी म्हणतात. इराणमध्ये पाण्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक मोठ्या संख्येने मशिदी आणि धार्मिक स्थळांवर जाऊन पावसासाठी प्रार्थना करत आहेत.