पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या; बेदम मारहाणीत मृत्यू, जमावानं मृतदेह पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 08:19 AM2021-12-04T08:19:00+5:302021-12-04T08:19:22+5:30

जमावाकडून श्रीलंकन अधिकाऱ्याला बेदम मारहाण; मृतदेह पेटवून दिला; घटनेची चौकशी सुरू

Sri Lankan factory manager lynched and set on fire in Pakistan | पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या; बेदम मारहाणीत मृत्यू, जमावानं मृतदेह पेटवला

पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या; बेदम मारहाणीत मृत्यू, जमावानं मृतदेह पेटवला

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानात मॉब लिचिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्दीनं त्या व्यक्तीचा मृतदेह पेटवला. सियालकोटमधील वझिराबाद मार्गावर ही घटना घडली. 

खासगी कंपनीत काम करत असलेल्या मजुरांनी कारखानाच्या व्यवस्थापकावर हल्ला केला. त्यानंतर मोठी गर्दी जमली. सगळ्यांनी व्यवस्थापकाला बेदम मारलं. त्यामुळे त्याचा जीव गेला. यानंतर गर्दीनं त्याला पेटवून दिलं. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गर्दीच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव प्रियांथा कुमारा असं आहे.

प्रियांथा कुमारा यांनी मोहम्मद पैगंबर यांची निंदा केल्याचा आरोप कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. प्रियांथा यांनी काही दिवसांपूर्वीच व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे निर्यात विभागाची जबाबदारी होती. प्रियांथा काम करत असलेल्या कारखान्यात पाकिस्तानच्या टी-२० संघासाठी साहित्य तयार केलं जातं. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.

ईशनिंदा पाकिस्तानात गुन्हा आहे. या गुन्ह्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते. मात्र अनेकदा याचा गैरवापर होतो. व्यवस्थापक प्रियांथानं तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तान (Tehreek-e-Labbaik Pakistan) या कट्टरवादी संघटनेचं एक पोस्टर फाडलं होतं. त्यावर कुरानमधील काही आयत लिहिण्यात आल्या होत्या. पाकिस्तान सरकारनं काही दिवसांपूर्वीच या संघटनेवरील बंदी हटवली आहे. प्रियांथानं इस्लामिक पक्षाचं पोस्टर फाडून ते कचराकुंडीत टाकलं. प्रियांथाची कृती काही कर्मचाऱ्यांनी पाहिली. त्यांनी ही बाब संपूर्ण कारखान्यात सांगितली. यानंतर मजुरांनी प्रियांथाला मारहाण केली. त्याला खेचत बाहेर आणण्यात आलं. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात प्रियांथाचा मृत्यू झाला. यानंतर जमलेल्या गर्दीनं मृतदेह पेटवून दिला.

Web Title: Sri Lankan factory manager lynched and set on fire in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.