वॉशिंग्टन - अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं. धक्क्यांची ही मालिका सुरूच असून, फेसबुक, ट्विटरनंतर गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. यानंतर आता ट्रम्प यांना आणखी एक झटका बसला आहे. सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने कायमस्वरुपी बॅन केलं आहे. 

स्नॅपचॅटने डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन करत असल्याचं जाहीर केलं आहे. अमेरिकेतील हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत. "आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे" अशी माहिती स्नॅपचॅटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांच्या अकाउंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होतं, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली असंही कंपनीने म्हटलं आहे. 

यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. ट्रम्प यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात यूट्यूबने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट काढून टाकण्यात आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे. या चॅनेलवरून आता सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही, असे यूट्यूबने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. 

 ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

 ट्रम्प यांच्या चॅनेलचे कमेंट सेक्शनही बंद करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या 2.77 मिलियन आहे. सिव्हिल राइट ग्रुपकडून गुगलला डोनाल्ड ट्रम्प यांचा यूट्यूब अकाऊंट बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. असे न केल्यास यूट्यूबवर जागतिक स्तरावर बहिष्कार घालण्यात येईल, अशी धमकी सिव्हिल राइट ग्रुपने दिली होती, असा दावा करण्यात येत आहे. 

ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून केली जातेय कारवाई  

दरम्यान, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर केले आहे. मात्र, यानंतर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केले जाईल, असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे. मात्र, फेसबुकने आपली कारवाई कायम ठेवली आहे. फेसबुककडूनही डोनाल्ड ट्रम्प यांचा अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन येथे डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून ही कारवाई केली जात आहे.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: snapchat bans donald trump permanently after capitol hills violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.