समुद्राचे पाणी होतेय ‘विषारी’ : समुद्री जीवसृष्टी धोक्यात, तुमच्या प्लेटमधील मासे गायब होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:39 IST2025-12-07T11:39:36+5:302025-12-07T11:39:54+5:30
हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.

समुद्राचे पाणी होतेय ‘विषारी’ : समुद्री जीवसृष्टी धोक्यात, तुमच्या प्लेटमधील मासे गायब होणार
स्कॉटलंड : स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्र्यूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी (ॲसिडिक) होत आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मधील प्रकाशित अभ्यासानुसार, कॅलिफोर्निया करंटसारख्या ‘अपवेलिंग’ क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढीमुळे होणाऱ्या सामान्य ॲसिडिफिकेशनपेक्षा वेगवान आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे.
२०व्या शतकापासून पीएचमध्ये घट : संशोधकांनी २०व्या शतकातील कोरल नमुन्यांचा बोरोन आइसोटोप वापरून अभ्यास केला. या अभ्यासात किनाऱ्यावरील पाण्याच्या पीएच पातळीत मागील सतत घट झाली आहे असून २१व्या शतकात ही घट आणखी वेगाने होण्याची चिन्हे आहेत. हा बदल जगभरातील सागरी जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे.
मत्स्यपालनाला मोठा धोका
‘अपवेलिंग’ प्रणाली हे पृथ्वीवरील सर्वाधिक मासेमारी उत्पादन देणारे क्षेत्र मानले जातात; परंतु जेव्हा हे खोल व आम्लधर्मी पाणी वारंवार पृष्ठभागावर येते व कार्बन डायऑक्साइडच्या संपर्कात येते. सीओ२ मुळे पाणी ॲसिडिक होते. तेव्हा मासे, कोळंबी, शिंपले आणि प्रवाळ यांसारखे समुद्री जीव वेगाने नष्ट होऊ लागतात.
पाणी ॲसिडिक होण्याची मुख्य कारणे काय आहेत?
वातावरणातील कार्बन डायऑक्साइड समुद्राच्या पाण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विरघळत आहे, ज्यामुळे पाण्याचा पीएच सतत कमी होत आहे.
‘अपवेलिंग’ प्रणाली : या प्रक्रियेमुळे समुद्राच्या खोल भागातील पाणी पृष्ठभागावर येते. परंतु सध्या ते अधिक आम्लधर्मी बनले आहे. हे आम्लधर्मी पाणी पृष्ठभागावर येताच हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या संपर्कात येते आणि त्यामुळे ते अनेक पटीने अधिक आम्लधर्मी बनते.