पेंग्विनने गिळला मास्क; वापरून फेकलेले मास्क, हातमोजांचा कचरा थेट समुद्रात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:50 AM2020-10-05T04:50:09+5:302020-10-05T04:50:21+5:30

अर्जेंटिनाहून स्थलांतर करत असलेल्या पेंग्विन समूहातून हा पेंग्विन मागे पडला, त्यात तो वाट चुकला असावा आणि पोटात मास्कगेल्यानं त्याच्या जिवावरही बेतलं.

penguin in Brazil died after swallowing a discarded N95 face mask | पेंग्विनने गिळला मास्क; वापरून फेकलेले मास्क, हातमोजांचा कचरा थेट समुद्रात?

पेंग्विनने गिळला मास्क; वापरून फेकलेले मास्क, हातमोजांचा कचरा थेट समुद्रात?

Next

कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्ट कोणती? - तर मास्क.

मात्र हे मास्क, पीपीई किट्स, वापरून फेकून देण्याचे हातमोजे, जेवणाचे डबे हे सारं पर्यावरणाच्या जिवावर उठणार, अशी चर्चा मे महिन्यापासूनच सुरूझाली आहे. त्यावर प्रतिवाद असाही केला जातो की, आज जगभर प्रश्नच माणसांच्या अस्तित्वाचा आहे. माणूस जगण्याचा आधी विचार करेल की, प्लॅस्टिकच्यासमस्येचा? मात्र आता हा वाद घालण्याचीही वेळ निघून गेली आहे आणि मास्क विशेषत: एन ९५ मास्कचा मोठा कचरा जगभर तयार झाला आहे. नुकतंच त्याचं एक उदाहरण समोर आालं आणि जगभर पुन्हा या चर्चेला तोंड फुटलं आहे. ब्राझीलच्या साओ पाओलो शहरातल्या समुद्रकिनारी एक पेंग्विन मृत आढळला. तो अतिशय कृश झालेला होता, अंगभर वाळू लडबडलेली होती. द अरगॉनॉटा नावाच्या एका सागरी जीवसंस्थेनं तो मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर असं लक्षात आलं की, सप्टेंबरच्या सुरुवातीला या पेंग्विनने एक एन ९५ मास्क गिळला होता. त्यानंतर त्याला खाता येईना, अन्नपचन प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला. आणि अखेरीस त्यातच तो दगावला. अर्जेंटिनाहून स्थलांतर करत असलेल्या पेंग्विन समूहातून हा पेंग्विन मागे पडला, त्यात तो वाट चुकला असावा आणि पोटात मास्कगेल्यानं त्याच्या जिवावरही बेतलं.

समुद्र्रकिनारी फिरणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनी आपले मास्ककुठंही इतस्तत: फेकणं, ते समुद्रात जाणं हे सर्रास घडत आहे. हा कचरा समुद्रीजीवांसाठी घातक ठरेल अशी चर्चा होतीच, मात्र आता त्याचा हा ठसठशीत पुरावाच समोर आला आहे. द वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर ( डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संस्थेनं जुलैमध्येच धोक्याचा इशारा दिला होता की, पीपीई किटची विल्हेवाट कशी लावणार याचा शासन आणि व्यवस्थांनी वेळीच विचार करून नियोजन करायला हवं नाहीतर ते सारं हाताबाहेर जाऊन पर्यावरणाला अतिशय घातक ठरेल.

खरं तर जगभर लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणाची प्रत सुधारली, शिकारींचं प्रमाण कमी झालं, रस्त्यावर मोर आले, नद्यांचं पाणी नितळ झालं, लांबची हिमशिखरं दिसू लागली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र त्याचवेळी पर्यावरणतज्ज्ञ इशारा देत होते की, कोरोनाकाळात प्लॅस्टिकचा वापर जगभरच प्रचंड वाढला आहे आणि त्याची विल्हेवाट हा या वर्षाखेरीपर्यंत मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल, आॅक्टोबर उजाडता उजाडता ते चित्र समोर येऊ लागलेलं आहे.

डब्ल्यूडब्ल्यूएफचं म्हणणं आहे की, जास्त नाही फक्त एक टक्का मास्क जरी जगभर इतस्तत: फेकले गेले, समुद्रकिनारी किंवा निसर्गात कुठंही भिरकावले गेले, तरी जगभरात रोज एक कोटी मास्क असे धोकादायक ठरण्याचं भय आहे. याशिवाय पीपीई किटसह अनेक गोष्टी प्लॅस्टिकमध्ये सतर्कतेनं पॅकिंग करून पाठवल्या जात आहेत, मात्र त्यामुळे विगतवारी यंत्रणांवर तर भार आहेच, मात्र निष्काळजीपणे मास्कसह प्लॅस्टिक इतस्तत: फेकणं यातून नाले तुंबणे, पाण्यांचे स्रोत तुंबणे, नदीचे प्रदूषण यासह अनेक गंभीर समस्या पुढे उभ्या आहेत, याचा इशारा विज्ञान आणि पर्यावरणविषयक संस्था संयुक्त राष्टÑसंघाला वारंवार देत आहेत. ब्रिटनमध्ये समुद्रकिनारी करण्यात आलेल्या सफाई मोहिमेत पक्षी मास्क कुरतडताना आढळले. काही पक्ष्यांवर उपचारही करण्यात आले. ब्रिटनने केलेल्या अभ्यासानुसार आता सुमारे ९६ टक्के लोक मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडतच नाहीत. मात्र ते मास्क धुऊन किती काळ वापरले जातात, एन ९५ मास्कफेकताना त्याची काय व्यवस्था लावली जाते याचा काहीही तपशील सध्या यंत्रणांकडे उपलब्ध नाही. अन्य विकसनशील देशात काय स्थिती असेल, याची तर कल्पनाच केलेली बरी. कोरोनाकाळात प्लॅस्टिकचा अतिवापर मानवी समुदायाला मोठ्या ‘इकॉलॉजिकल डिझास्टर’ अर्थात परिसंस्था संकटात लोटणार आहे असं आता देश-विदेशातले अभ्यासक सांगत आहेत.

मात्र कोरोनाने पिचलेले देश माणसांना जगवण्याची लढाई लढत असताना, हे सारे इशारे मागे पडत आहेत, त्यात निष्काळजीपणा नावाची घोडचूक सामान्य माणसंही करत आहेतच..

Web Title: penguin in Brazil died after swallowing a discarded N95 face mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.