'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:11 IST2025-05-20T09:07:05+5:302025-05-20T09:11:21+5:30
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान ...

'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर जरी मोहिम तात्पुरती थांबवण्यात आली असली, तरी ती अजूनही संपलेली नाही. भारताची दहशतवादाविरोधातील कारवाई चालूच राहणार असून, पाकिस्तानने दहशतवाद्यांना भारताच्या हवाली न केल्यास हे ऑपरेशन थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
दहशतवाद्यांचा नायनाट होईपर्यंत ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही!
इस्रायली चॅनेल 'आय २४'ला दिलेल्या एका मुलाखतीत जेपी सिंह म्हणाले, "पाकिस्तान हाफिज सईद, साजिद मीर आणि झाकीउर रहमान लखवी यांच्यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करत नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार. ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारताचे दहशतवादाविरुद्धचे युद्ध आहे, आणि हे युद्ध केवळ बंदुकीने नव्हे, तर धोरणात्मक आणि राजनैतिक स्तरावरही चालेल."
पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झाले ऑपरेशन सिंदूर!
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना, राजदूत जेपी सिंह यांनी म्हटले की, "दहशतवाद्यांनी गोळी मारण्यापूर्वी लोकांचा धर्म विचारला आणि नंतर २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली. या अमानवी कृत्याच्या विरोधात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. भारताची कारवाई दहशतवादाविरुद्ध होती. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय लष्करी तळ आणि निवासी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली."
Me. JP Singh, the Indian ambassador to Israel, addresses Operation Sindoor that 'taught a lesson' to Pakistan after the deadly terror attack in Kashmir.
— Augadh (@AugadhBhudeva) May 19, 2025
Innocent people in Kashmir were asked their religion and shot point blank in front of their families…that is when our Prime… pic.twitter.com/aXL2zfWzBu
युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर सिंह म्हणाले की, "भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर प्रहार करून आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. जिथे दहशतवादी दिसतील, तिथे त्यांचा नायनाट केला जाईल."
पाण्याच्या बदल्यात पाकिस्तानने दहशतवाद दिला!
सिंधू पाणी कराराचा उल्लेख करताना, जेपी सिंह यांनी पाकिस्तानवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “१९६०चा करार भारत-पाकिस्तान मैत्रीसाठी होता. पण, आम्ही पाणी देत होतो आणि त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून दहशतवाद येत होता. हे बदलणे गरजेचे आहे. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, हे आमच्या पंतप्रधानांनीही स्पष्ट केले आहे.”
दहशतवाद संपवाच, अन्यथा करार धोक्यात
भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत म्हटलं की, "जर पाकिस्तानला सिंधू करार चालू ठेवायचा असेल, तर त्यांना दहशतवादाचा कायमस्वरूपी अंत करावा लागेल. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना पाकिस्तानात सक्रिय असताना शांतता शक्य नाही.”