‘नोमॅडलँड’ : दुसऱ्या अमेरिकेची रानोमाळ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:16 AM2021-04-27T00:16:57+5:302021-04-27T00:17:38+5:30

अमेरिकेतले कलाकार, साहित्यिक राजकीय-सामाजिक समस्यांपासून दूर पळत नाहीत,  समस्यांना भिडतात, मग त्या बद्दल सरकार काही म्हणो, पुढारी काही म्हणोत ...

‘Nomadland’: Another American Ranomal story | ‘नोमॅडलँड’ : दुसऱ्या अमेरिकेची रानोमाळ गोष्ट

‘नोमॅडलँड’ : दुसऱ्या अमेरिकेची रानोमाळ गोष्ट

Next

अमेरिकेतले कलाकार, साहित्यिक राजकीय-सामाजिक समस्यांपासून दूर पळत नाहीत,  समस्यांना भिडतात, मग त्या बद्दल सरकार काही म्हणो, पुढारी काही म्हणोत किंवा पक्ष काही म्हणोत. २००८ साली अमेरिकेत सबप्राइम घोटाळा झाला. घरकर्ज गहाण ठेवून त्यावर चालवलेली अर्थव्यवस्था कोसळली. अमेरिकेत प्रचंड मंदी निर्माण झाली. लक्षावधी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबं धुळीला मिळाली, बेघर झाली. 

नोमॅडलँड हा यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातली बहुतेक  बक्षिसं पटकावणारा सिनेमा सबप्राईम घोटाळ्यामुळं बेघर झालेल्या अमेरिकन लोकांच्या प्रश्नाकडं  जगाचं लक्ष वेधतो. सबप्राइम घोटाळा करणारे बँकर, वित्त व्यवसायातले लोक सुशेगात राहिले, सरकारनं त्यांना भरमसाट पैसे देऊन जगवलं; पण लक्षावधी गरीब आणि मध्यमवर्गीयांना मात्र सरकारनं वाऱ्यावर सोडलं. ती वाऱ्यावर सोडलेली माणसं कशी जगतात ते नोमॅडलँडमधे पाहायला मिळतं.

चित्रपटातलं मुख्य पात्र फर्न हिचा नवरा वारलाय. तिला पक्की आणि गच्च पगाराची  नोकरी नाही. दुकानात, गोदामात, कारखान्यात बेभरवशाच्या फुटकळ नोकऱ्या, कामं करून ती जगते. तिला राहायला घर नाही. तिनं एक जुनी व्हॅन खरेदी केलीय, त्या व्हॅनमधे आवश्यक त्या सोयी केल्यात, ते झालंय तिचं चाकावरचं घर. 
फर्न कामाच्या शोधात गावोगाव फिरते. जिथं काम मिळतं तिथंच काही अंतरावर मोकळ्या मैदानात ती आपलं चार चाकावरचं घर पार्क करते. नवी नोकरी, नवी जागा, नवं मैदान; घर मात्र तेच!

फर्नचं घर माळरानावर पार्क केलेलं असतं. तिथं तिच्यासारखेच बेघर लोक त्यांची त्यांची घरं पार्क करून राहतात. या बेघर-भटक्यांचा एक अस्थायी समाज तयार होतो. अडगळ जाळून ते थंडीसाठी शेकोटी करतात. जुने कपडे नव्यानं शिवून घेतात. बादल्या, रंगाचे डबे हे त्यांचे संडास असतात. 

फर्न या वातावरणात राहत असली तरी तिच्यात कडवटपणा नाही. तिच्यात माणुसकी शिल्लक आहे. ती तिच्या ‘किचन’मधे कॉफी करते आणि एका थर्मासमधे भरून गरजू माणसांना वाटत फिरते. आपल्याजवळचं काहीही  कोणालाही द्यायला, शेअर करायला ती तयार असते. ही माणसं आनंदात असतात. कोणी  मेहेरबानी म्हणून काही द्यायला लागलं तर ते त्यांना आवडत नाही. यांच्या जीवनात वस्तू केवळ गरजेपुरत्याच असतात. 

- एक वेगळीच अमेरिका या चित्रपटात दिसते.

आपण एक अमेरिका नेहमी पहातो. त्या अमेरिकेत उंच इमारती, फ्लायओव्हरची जाळी, विमानांचा आकाशातला ट्राफिक जॅम, वस्तूंनी ओसंडून वाहणारी दुकानं, बंदुका, ड्रग, खून इत्यादी गोष्टी आपल्याला दिसतात... पण त्याच अमेरिकेत काही लाख लोक अशा रीतीनं माळावरचं जीणं जगत असतात.

क्लोई चाव या दिग्दर्शिकेनं बेघर भटक्यांचं जगणं जसं असतं तसं या चित्रपटात चितारलंय. या आधी याच दिग्दर्शिकेचा ‘दी साँग्ज दॅट माय ब्रदर टॉट मी’ या शीर्षकाचा चित्रपट येऊन गेला होता. गावाबाहेर रहाणाऱ्या गोरेतर अमेरिकन (लॅटिनो, इंडियन्स) समाजाचं चित्रण त्या चित्रपटात होतं. त्या समाजाचं चर्च वेगळं, तिथली न्यायव्यवस्था वेगळी, तिथली अर्थव्यवस्था (त्यात बेकायदेशीर व्यवसाय येतात) वेगळी. 
आपल्याला माहीत असलेल्या अमेरिकन समाजाला समांतर असणारे, समाजापासून फटकून असणारे अमेरिकेतले समाज चाव दाखवतात. गंमत म्हणजे हे समाज मुख्य अमेरिकन समाजापेक्षा अधिक ऊबदार, उदार, माणुसकीनं भरलेले दिसतात.
अमेरिकेची गंमतच आहे.

अमेरिकन समाजावर कोरडे ओढणाऱ्या कलाकृती अमेरिकन माणसंच तयार करतात, त्यांचं कौतुकही अमेरिकन माणसं करतात आणि अशा कलाकृतींना अमेरिकन माणसंच मान्यता देतात, बक्षीसं देतात. चाव मुळातल्या चिनी आहेत. त्यांच्या आई-वडिलांबरोबर त्या अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. त्यांनी केलेले सिनेमे पाहून अमेरिकन माणसं असं म्हणत नाहीत की ‘बाई बाहेरून येते, इथे आमच्या देशात राहते आणि आमच्यावर टीका करते, देशद्रोहीच आहे मेली.’ 
- निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार
 

Web Title: ‘Nomadland’: Another American Ranomal story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर