MP found hiding money in underwear, accused of scam in Corona Fund in Brazil | अंडरवेअरमध्ये पैसे लपवताना सापडले खासदार, कोरोना फंडात घोटाळा केल्याचा आरोप

अंडरवेअरमध्ये पैसे लपवताना सापडले खासदार, कोरोना फंडात घोटाळा केल्याचा आरोप

ठळक मुद्देराष्ट्रपती जेअर बोलसनारो यांच्या पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहात सापडलेखासदार चिको रॉड्रिग्स यांच्या अंडरवेअरमधून ३ लाख ८८ हजार ब्राझिलीयन रियाल एवढी रक्कम जप्त आपल्याचा बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे, चिको रॉड्रिग्स यांनी केला दावा

रियो दि जानिरो  - ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावासोबतच भ्रष्टाचाराच्या प्रकारांनाही ऊत आला आहे. यादरम्यान भ्रष्टाचारविरोधी पथकाने घातलेल्या एका धाडीत राष्ट्रपती जेअर बोलसनारो यांच्या पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहात सापडले. तपासणीदरम्यान, खासदार चिको रॉड्रिग्स यांच्या अंडरवेअरमधून ३ लाख ८८ हजार ब्राझिलीयन रियाल एवढी रक्कम जप्त करण्यात आली.

सत्ताधारी पक्षातील एक सिनेटर भ्रष्टाचारामध्ये गुंतला असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर उत्तर ब्राझीलमधील रोरिमा राज्यातील चिको रॉड्रिग्सच्या घरावर बुधवारी धाड टाकण्यात आली. त्यांच्यावर रोरिमा राज्याला कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी देण्यात आलेल्या फंडामध्ये अफरातफर करण्यात आल्याचा आरोप आरोप होता.

दरम्यान, चिको रॉड्रिग्स यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून धाडीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आपल्या घराची तपासणी केली आहे. मात्र जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तसेच ही रक्कम कुठे सापडली याचाही उल्लेख केलेला नाही. तसेच आपण काहीही चुकीचे केलेले नाही. आपल्याचा बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसनारो यांनी या संपूर्ण घटनेचे खापर प्रसारमाध्यमांच्या डोक्यावर फोडले आहे. सरकारला भ्रष्टाचारी सिद्ध करण्यासाठी खोट्या घटनेचा वापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ही कारवाई म्हणजे आमचे सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोरपणे पावले उचलत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा बोलसनारो यांनी केला आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसनारो यांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच सत्ता मिळाली होती. मात्र त्यांनी जेव्हापासून सत्ता सांभाळली आहे तेव्हापासून त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. बोलसनारो यांचे पुत्र फ्लेव्हियो यांच्यावरही असेच आरोप झाले होते. रियो दि जानिरो प्रतिनिधित्व करत असताना सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MP found hiding money in underwear, accused of scam in Corona Fund in Brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.