नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 09:42 AM2019-07-15T09:42:02+5:302019-07-15T11:25:20+5:30

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे.

many people dead in nepal due to flooding and landslide in the country | नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Next
ठळक मुद्दे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे.मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जण जखमी झाले असून 30 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे.

काठमांडू - नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जण जखमी झाले असून 30 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. तसेच महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.


नेपाळ आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख बेद निधी खानल यांनी वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, देशात 200 पेक्षा अधिक भागात पावसाचा फटका बसला आहे.  पूरग्रस्त भागात अन्न आणि गरजोपयोगी सामान पोहोचवले जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. राजधानी काठमांडूमध्ये सुद्धा काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घर कोसळून झालेल्या घटनेत एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, पूर्वेकडील खोतांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

आसाममधील पूरस्थिती गंभीर; 14 लाख लोकांना फटका

आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी तीन जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या सहा झाली आहे. 21 जिल्ह्यांतील 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गोलाघाट आणि दिमा हसाव जिल्ह्यांत आणखी तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दोन जण गोलाघाट जिल्ह्यात, तर एक जण दिमा हसाव जिल्ह्यात मरण पावला. राज्यातील 21 जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे. पुराचा सर्वाधिक फटका बारपेट जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील 3.5 लाख लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. त्याखालोखाल धेमजी जिल्ह्यातील 1.2 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. 

 

Web Title: many people dead in nepal due to flooding and landslide in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.