Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:28 IST2025-06-13T12:24:59+5:302025-06-13T12:28:14+5:30
Israel's Operation Rising Lion Latest News: इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणवर मोठा हल्ला केला. इराणमधील आण्विक केंद्रानाच इस्रायलने लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह काही अणुशास्त्रज्ञही ठार झाले आहेत.

Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू
Israel strike on Iran Hossein Salami killed: इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी संघर्षाचा भडका उडाला. इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन हाती घेत इराणच्या आण्विक केंद्र आणि लष्करी छावण्यांना लक्ष्य करत मिसाईल डागल्या. यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर काही महत्त्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. इराणवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. तर इराणकडून नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्झ यांनी सांगितले की, आम्ही इराणवर हल्ले केले आहे. इराणकडून हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याने आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
वाचा >>इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
"इराणवर इस्रायलने हल्ला केला असून, प्रत्युत्तरात आमच्यावरही मिसाईल किंवा ड्रोन हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे", असे कात्झ यांनी सांगितले.
आण्विक केंद्र अन् लष्करी छावण्यांवर इस्रायलने डागली क्षेपणास्त्रे
वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत अंदाधुंद हल्ले केले. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असून, लष्करी अधिकारीही मारले गेले आहेत.
इस्रायलच्या ऑपरेशन लायझिंग लायनमध्ये रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख म्हणजे इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार झाले आहेत. त्याचबरोबर इराणच्या लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत.
इराणमधील सरकारी टीव्हीने अणु वैज्ञानिकांची नावे जाहीर केली आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुऊर्जा संस्थेचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी आणि तेहरानमधील इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष (कुलगुरू) मोहम्मद मेहदी यांचा मृत्यू झाला आहे. अब्बासी यांची २०१० मध्येही हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यात ते वाचले होते.
इराणने म्हटलं आहे की, इस्रायलने इराणच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. नतांज येथील अणु केंद्रावर स्फोट झाला असून, हे केंद्र तेहरानपासून दक्षिणेला २२५ किमी अंतरावर आहे.
इराणने नवीन लष्करप्रमुखाची केली नियुक्ती
हुसैन सलामी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराण रिव्हॉल्युशनरी गार्डचे प्रमुख म्हणून कुद्रस फोर्सचे माजी प्रमुख जनरल वाहिदी यांची नियुक्ती केली आहे. कमांडर-इन चीफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कराची सूत्रे हाती येताच वाहिदींनी इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.