अखेर बहिणीला भेटीची परवानगी; इम्रान समर्थकांसमोर पाकिस्तान सरकार झुकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:48 IST2025-12-02T18:46:43+5:302025-12-02T18:48:10+5:30
Imran Khan Pakistan: इम्रान खान यांची त्यांच्या बहिणीसोबत शेवटची भेट 4 नोव्हेंबरला झाली होती.

अखेर बहिणीला भेटीची परवानगी; इम्रान समर्थकांसमोर पाकिस्तान सरकार झुकले
Imran Khan Pakistan:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PTI पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात गेल्या महिनाभरात व्यापक आंदोलन सुरू आहे. अखेर मोठ्या दबावानंतर पंजाब प्रांत सरकारने इम्रान खान यांच्या बहिणीला जेलमध्ये भेटण्याची परवानगी दिली आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी मंगळवारी या निर्णयाची घोषणा केली.
4 नोव्हेंबरनंतर पहिली भेट
इम्रान खान यांची त्यांच्या बहिणीसोबत शेवटची भेट 4 नोव्हेंबरला झाली होती. त्यानंतर संपूर्ण महिनाभर कोणालाही भेटण्यास मनाई होती. यामुळे त्यांचे समर्थक देशभर रस्त्यावर उतरत आंदोलन करत होते. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून सरकारने फक्त त्यांची बहीण अजमी यांना जेलमध्ये भेटण्याची परवानगी दिली आहे.
इम्रानचे पुत्र कासिम यांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांना जेलच्या फाशी घरात ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत समर्थकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
आदियाला जेलबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी
मंगळवारी (2 डिसेंबर) इम्रान खान यांना भेटू देणार असल्याची माहिती मिळताच, आदियाला जेलबाहेर हजारो समर्थक जमा झाले. समर्थकांचे जत्थे रावळपिंडीच्या विविध भागातून जेलकडे निघाले. अनेक ठिकाणी समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व वादविवादही झाले.
जेलच्या बाहेर PTI समर्थक "इम्रानला मुक्त करा" आणि "इम्रान झुकेगा नहीं" अशा घोषणा देत होते. काही ठिकाणी पाकिस्तानच्या घटनात्मक व्यवस्थेत बदल करण्याची मागणीही जोर धरत होती.
PTI ची ‘आर-पारची लढाई’ सुरू
इम्रान खान यांचे समर्थक सरकारवर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहेत. पूर्वी प्रत्येक आठवड्यात इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी मिळायची, पण आता कोर्टाची परवानगी असतानाही भेट नाकारली जात असल्याचे PTI चे म्हणणे आहे. इमरान यांच्या बहिणींनी नुकतेच इस्लामाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. बहीण आलिमा यांनी जेल प्रशासनावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.