'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:36 AM2019-04-06T08:36:38+5:302019-04-06T08:37:24+5:30

हेलिकॉप्टर घोटाळा; ख्रिश्चन मिशेलचा न्यायालयात अर्ज

I did not name the political leader | 'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही'

'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही'

googlenewsNext

नवी दिल्ली : मी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असा खुलासा अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेल याने शुक्रवारी न्यायालयापुढे केला. ईडीने मिशेलविरुद्ध न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. चौकशीत मिशेलने काही राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचा दावा ‘ईडी’ने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

केंद्र सरकार ‘ईडी’सारख्या संस्थांचा वापर राजकीय उद्दिष्टांसाठी करीत असल्याचा आरोप मिशेलने केला. मिशेलने काही नेत्यांची नावे घेतल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये असल्याचे वृत्त पसरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी काँग्रेसचे अहमद पटेल व गांधी कुटुंबियांविरोधात टीकास्त्र सोडले होते. त्याने पटेल व गांधी कुटुंब यांना लाच दिल्याचे म्हटले असल्याचे भाजप नेते सांगत फिरत होते. त्यानंतर मिशेल याने न्यायालयात अर्ज केला. पूर्वीचे सरकार, संरक्षण दलातील अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी आणि पत्रकार यांना या वादग्रस्त सौद्यामध्ये लाभ झाल्याचे मिशेल याने चौकशीत कबूल केल्याचे ईडीच्या आरोपपत्रामध्ये म्हटले होते.
विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी शनिवारी पुढील सुनावणी ठेवली असून, मिशेलच्या अर्जाविषयी ईडीला म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

केवळ खळबळ निर्माण करण्यासाठी
मिशेलने ईडीच्या चौकशीत कोणाचेही नाव घेतलेले नाही. केवळ खळबळ निर्माण करण्यासाठी त्याने राजकीय नेत्यांची नावे घेतल्याचे वृत्त पसरवून आपल्या अशिलावरील आरोप भक्कम करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे मिशेलचे वकील अ‍ॅड. ए. के. जोसेफ यांनी न्यायालयास सांगितले. दोषारोपपत्र गुरुवारी दाखल झाले. मिशेल याला त्याची प्रत मिळण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना ती देण्यात आली, असा दावा जोसेफ यांनी केला. दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: I did not name the political leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.