तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:25 IST2025-12-09T08:25:09+5:302025-12-09T08:25:32+5:30
या प्रणालीमुळे आता सुई न टोचता आणि रक्त न काढता रक्तातील साखरेची पातळी तपासणे शक्य होणार आहे. ही प्रणाली प्रकाश तरंगांचा वापर करून शरीरातील ग्लुकोजची पातळी वाचते.

तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
वॉशिंग्टन (अमेरिका) : मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या शास्त्रज्ञांनी मधुमेह रुग्णांसाठी एक क्रांतीकारी ग्लुकोज सेन्सर विकसित केला आहे. या प्रणालीमुळे आता सुई न टोचता आणि रक्त न काढता रक्तातील साखरेची पातळी तपासणे शक्य होणार आहे. ही प्रणाली प्रकाश तरंगांचा वापर करून शरीरातील ग्लुकोजची पातळी वाचते.
कसे काम करते हे तंत्रज्ञान?
प्रकाश तरंगांचा वापर हा नवीन सेन्सर ‘रमन स्पेक्ट्रोस्कोपी’ या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पद्धतीत, त्वचेवर एक विशिष्ट प्रकाश टाकण्यात येतो. त्वचेतून परत येणाऱ्या संकेतांचे विश्लेषण करून रक्तातील ग्लुकोजची माहिती गोळा केली जाते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, बोटावर सुई टोचून तपासणी करण्याऐवजी किंवा सध्याच्या वेअरेबल उपकरणांऐवजी हे नवे तंत्रज्ञान फक्त ३० सेकंदांत रीडिंग देते. याची अचूकता प्रमुख वेअरेबल उपकरणांएवढीच मानली गेली आहे.
तंत्रज्ञानाचा प्रवास, विकास
२०१० मध्ये एमआयटीमध्ये पहिल्यांदा हे सिद्ध झाले होते की, रक्ताचा नमुना न घेताही रमन तंत्रज्ञान साखरेची पातळी वाचू शकते.
२०२० मध्ये प्रकाशाच्या नवीन कोनांचा वापर करून ग्लुकोजचे संकेत अधिक स्पष्ट झाले आणि हे तंत्रज्ञान व्यावहारिक स्तरावर आणण्यास मदत झाली. सुरुवातीला या तंत्रज्ञानाचा पहिला मॉडेल डेस्कटॉप प्रिंटर एवढा मोठा होता.
त्यानंतर तो शु-बॉक्सच्या आकारापर्यंत लहान करण्यात आला. आता शास्त्रज्ञांनी उपकरणाचा आकार लक्षणीयरीत्या कमी केली आहे.
आता असेल स्मार्टवॉच एवढा छोटा सेन्सर
विशेषज्ञांचे मत आहे की, भविष्यात हा सेन्सर स्मार्टवॉच एवढा छोटा बनवला जाऊ शकतो. सध्या ही टीम या उपकरणाची अचूकता सुनिश्चित करण्यावर आणि त्याचा अधिक छोटा, पोर्टेबल व्हर्जनमध्ये बनवण्यावर काम करत आहे.
यामुळे मधुमेह रुग्णांना रोजच्या तपासणीच्या त्रासातून मोठी मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे केवळ सेन्सरने रक्त तपासणी होईल, सुई टोचणे, रक्त काढणे या वेळखाऊ प्रक्रिया कराव्या लागणार नाहीत.