पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:05 IST2025-12-02T15:57:34+5:302025-12-02T16:05:07+5:30
गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानमध्ये एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे!

पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग!
पाकिस्तानमध्ये मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस अर्थात एचआयव्ही संसर्गाने आता महामारीचे रूप धारण केले आहे. गेल्या १५ वर्षांत पाकिस्तानमध्ये एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे, म्हणजेच रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये एचआयव्ही संसर्गाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. एका रिपोर्टनुसार, २०१० मध्ये देशात एचआयव्हीचे एकूण १६,००० रुग्ण होते, जी संख्या २०२४ पर्यंत वाढून ४८,००० झाली आहे. याचा अर्थ अवघ्या १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पूर्व भूमध्यसागरीय प्रदेशात एचआयव्हीची सर्वात वेगाने पसरणारी महामारी पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या रिपोर्टनुसार, जागतिक एड्स दिनानिमित्त WHO आणि UNAIDSद्वारे आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती सार्वजनिक करण्यात आली.
उच्च धोक्याच्या गटातून सामान्य लोकांपर्यंत फैलाव
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, पूर्वी एचआयव्हीचा संसर्ग प्रामुख्याने उच्च धोका असलेल्या गटांमध्ये उदा. अमली पदार्थांचे इंजेक्शन घेणारे किंवा पूर्व संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणारे इथपर्यंत मर्यादित होता. मात्र, आता हा संसर्ग लहान मुले आणि सामान्य लोकसंख्येमध्येही झपाट्याने पसरत आहे.
असुरक्षित रक्त संक्रमण, दूषित सुया/इंजेक्शनचा वारंवार वापर, संसर्ग नियंत्रणात गंभीर कमतरता, प्रसूतीपूर्व तपासणीत एचआयव्ही चाचणीचा अभाव, असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्हीशी संबंधित सामाजिक कलंक, उपचार आणि तपासणी सुविधांपर्यंत मर्यादित पोहोच ही एचआयव्ही पसरण्याची मुख्य कारणे आहेत.
३.५ लाख लोकांना संसर्ग, पण ८०% लोकांना माहितीच नाही!
रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये अंदाजे ३.५ लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे. मात्र, यापैकी सुमारे ८०% लोकांना आपल्या संसर्गाची स्थिती पूर्णपणे माहित नाही. ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये नवीन एचआयव्ही प्रकरणांची संख्या २०१० मध्ये ५३० होती, जी २०२३ पर्यंत वाढून १,८०० झाली आहे.
गेल्या दशकात अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ८ पटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ही संख्या ६,५०० होती, ती २०२४ मध्ये ५५,५०० झाली आहे. ART केंद्रांची संख्याही २०१० मध्ये १३ वरून २०२५मध्ये ९५ पर्यंत वाढली आहे.
उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी
रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये केवळ २१ टक्के संक्रमित लोकांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती होती. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी फक्त १६ टक्के लोकच उपचार घेत होते आणि केवळ ७ टक्के लोक व्हायरल लोड कमी करू शकले होते. २०२४ मध्ये एड्समुळे १,१०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 'डॉन'च्या रिपोर्टनुसार, अनेक प्रकरणांमध्ये ८०% पेक्षा जास्त मृत्यू मुलांचे होते. सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे, ० ते १४ वयोगटातील एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांपैकी केवळ ३८ टक्के मुलांनाच उपचार मिळू शकले आहेत.