शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:58 IST2025-12-09T12:57:31+5:302025-12-09T12:58:51+5:30
हिना मीर यांनी २२ वर्षीय हिमांशी गोंगले नावाच्या भारतीय विद्यार्थिनीला दोन मुलांची काळजी घेण्यासाठी नॅनी म्हणून कामावर ठेवले होते.

शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेल्या व्यक्तींकडून कायद्याचे पालन होणे अपेक्षित असते, पण लंडनमध्ये एका प्रतिष्ठित लेबर पार्टीच्या नेत्यानेच इमिग्रेशन कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. स्थानिक कौन्सिलर आणि सॉलिसिटर असलेल्या हीना मीर यांना एका भारतीय विद्यार्थिनीला बेकायदेशीरपणे नॅनी म्हणून कामावर ठेवल्याप्रकरणी मोठा झटका बसला आहे. या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर तब्बल ४८ लाख रुपयांचा (४०००० पाउंड) दंड ठोठावण्यात आला आहे.
१२०० युरो पगारात सहा दिवस २४ तास काम
डेली टेलीग्राफच्या कोर्ट रिपोर्टनुसार, हिना मीर या हाऊन्स्लो भागाच्या माजी उप-महापौर होत्या. त्यांनी २२ वर्षीय हिमांशी गोंगले नावाच्या भारतीय विद्यार्थिनीला त्यांच्या दोन मुलांची काळजी घेण्यासाठी नॅनी म्हणून कामावर ठेवले होते. आठवड्यातून तब्बल सहा दिवस आणि २४ तास तिला काम करावे लागत होते. मीना मीर हिमांशीला दर महिन्याला १,२०० पाउंड (भारतीय चलनात सुमारे १ लाख ४३ हजार ९४५ रुपये) इतका पगार देत होत्या.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, हिमांशीचा व्हिसा मार्च २०२३ मध्येच संपला होता, त्यामुळे तिला यूकेमध्ये कायदेशीररित्या काम करण्याचा कोणताही अधिकार नव्हता.
खोटे नाव कोर्टात उघड!
आपला गुन्हा लपवण्यासाठी हिना मीर यांनी एक नाटकच रचले होते. त्यांनी हिमांशीचे नाव बदलून 'रिया' ठेवले होते आणि अधिकाऱ्यांसमोर दावा केला की 'रिया' ही एक सामाजिक कामांसाठी भेट देणारी व्यक्ती आहे. ती त्यांच्या घरी फक्त व्हिडीओ गेम्स खेळायला, टीव्ही बघायला आणि आराम करायला यायची. अगदी घराची छोटी-मोठी कामे ती मैत्रीपोटी करत असे, असा त्यांचा युक्तिवाद होता.
मात्र, सिटी ऑफ लंडन काउंटी कोर्टात हा दावा खोटा ठरला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका पोलीस कारला मदतीसाठी थांबवत असताना हिमांशी खूप अस्वस्थ अवस्थेत आढळली होती. चौकशीत तिने अधिकाऱ्यांना सांगितले की, तिला शारीरिक त्रास दिला जात होता आणि ती आत्मघातकी विचार करत होती.
इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन; ४८ लाखांचा दंड
मीरा यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की हिमांशीने इमिग्रेशन फायदे मिळवण्यासाठी ही खोटी कहाणी रचली आहे. परंतु, कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायाधीश स्टीफन हेलमन यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले, "कॉउन्सिलर हिना मीर या एक चांगल्या चारित्र्याच्या व्यक्ती आणि सॉलिसिटर आहेत यात शंका नाही, परंतु त्यांच्या स्वतःच्याच विधानांमध्ये अनेक विसंगती आढळल्याने त्यांच्या पुराव्यावर विश्वास ठेवता येत नाही."
जानेवारी महिन्यात इमिग्रेशन नियमांनुसार अपील हरल्यानंतर हीना मीर यांना ४०,००० पाउंडचा दंड आणि त्यासोबतच ३,६२० पाउंड (सुमारे ३.६ लाख रुपये) कोर्टाचा खर्च भरावा लागणार आहे.
कॉउन्सिलर पदाच्या राजीनाम्याची मागणी
या घटनेमुळे लंडनच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. मीर यांच्या स्थानिक हॉन्स्लो कॉउन्सिलमधील विरोधी पक्ष, कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या प्रतिनिधींनी तात्काळ त्यांच्या कॉउन्सिलर पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कंजरवेटिव्ह पार्टीचे कॉउन्सिलर जॅक एम्सली यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, "हे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. येथील रहिवाशांना खऱ्या अर्थाने यापेक्षा अधिक चांगल्या प्रतिनिधीची गरज आहे." एका लोकप्रतिनिधीनेच अशा पद्धतीने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.