ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 08:33 IST2025-12-02T08:32:34+5:302025-12-02T08:33:42+5:30
अल्बानीज यांची स्वतःचीही एक कहाणी आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्या आजूबाजूला फक्त आईलाच पाहिलं, वडील कधी दिसले नाहीत.

ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज सध्या चांगलेच गाजताहेत. अर्थातच हे कारण देशांतर्गत राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित नाही. अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आहे, त्यांनी वयाच्या ६२व्या वर्षी लग्न केलं. दुसरं कारण आहे त्यांनी आपल्यापेक्षा वयानं बऱ्याच म्हणजे १६ वर्षांनी लहान महिलेशी लग्न केलं. तिसरं कारण आहे, ऑस्ट्रेलियाच्या १२४ वर्षाच्या इतिहासात पदावर असताना लग्न करणारे ते पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आहेत.
अल्बानीज यांनी शनिवारी ४६ वर्षांच्या जोडी हेडनशी कॅनबरा येथे लग्न केलं. हेडन फायनॅन्शियल सर्व्हिसमध्ये काम करतात. अल्बानीज आणि हेडन यांचा फेब्रुवारी २०२४मध्ये साखरपुडा झाला होता. अल्बानीज यांनी सोशल मीडियावर एका शब्दात पोस्ट केलं मॅरिड! यासोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला, ज्यात ते बो-टाय घालून आपल्या हसतमुख नववधूचा हात धरलेले दिसतात.
अल्बानीज यांचं हे दुसरं लग्न आहे. २०१९मध्ये पहिली पत्नी कार्मेल टेबट यांच्याशी त्यांनी घटस्फोट घेतला होता. हे लग्न १९ वर्षे टिकलं. या नात्यातून त्यांना नाथन नावाचा एक मुलगा आहे. अल्बानीज आणि हेडन यांची भेट २०२०मध्ये मेलबर्नमधल्या एका बिझनेस डिनरमध्ये झाली होती. हेडन यांचंही हे दुसरं लग्न आहे. मात्र, त्यांच्या पहिल्या लग्नाची आणि घटस्फोटाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
अल्बानीज यांची स्वतःचीही एक कहाणी आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्या आजूबाजूला फक्त आईलाच पाहिलं, वडील कधी दिसले नाहीत. जेव्हा त्यांनी वडिलांविषयी विचारलं, तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की, त्यांची आई विदेश प्रवासात त्यांच्या वडिलांना भेटली, त्यांच्याशी लग्न झालं आणि ऑस्ट्रेलियात परतल्यावर कार अॅक्सिडंटमध्ये वडिलांचं निधन झालं. ही कहाणी ऐकतच ते लहानाचे मोठे झाले. अल्बानीज १४ वर्षांचे असताना एक दिवस त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं की, खरंतर तिचं लग्नच झालं नव्हतं. ती इटलीत एका माणसाला भेटली, त्याच्याशी प्रेम जुळलं आणि ती गर्भवती राहिली.
अल्बानीज यांचे वडील कार्लो हे क्रूज शिपवर मॅनेजर होते. १९६२मध्ये विदेश प्रवासादरम्यान त्यांची मॅरियनशी भेट झाली. दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. पण, त्यावेळी कार्लो यांचा दुसऱ्या एका महिलेशी साखरपुडा झालेला होता. कुटुंब आणि समाजाच्या भीतीनं त्यांनी हे नातं तोडलं नाही. आईच्या भावना जपण्यासाठी अल्बानीज यांनी तिच्या जिवंतपणी कधीच वडिलांचा शोध घेतला नाही. २००२मध्ये आईचं निधन झाल्यावर त्यांनी हा शोध सुरू केला.
एके दिवशी अल्बानीज यांना त्यांचा मुलगा नाथन यानं विचारलं, 'तुमचे वडील कुठं आहेत?', तेव्हा त्यांना जाणवलं आपल्या वडिलांचा शोध घेणं आता आवश्यक आहे. अल्बानीज यांच्याकडे वडिलांना शोधण्याचा एकच धागा होता. त्यांच्याकडे एक जुना फोटो होता, ज्यात त्यांचे वडील एका जहाजावर दिसत होते जिथं ते काम करत होते. त्याच फोटोत त्यांची आईदेखील होती. त्याच फोटोच्या आधारे त्यांनी क्रूज कंपनीकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस कंपनीकडून त्यांना फोन आला, की त्यांचे वडील सापडले! त्यानंतर ते इटलीला जाऊन वडिलांना भेटले. जानेवारी २०१४मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं.