आर्थिक मंदीच्या भीतीने अमेरिकेत खनिज तेलाच्या दरात विक्रमी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:38 AM2020-04-21T03:38:38+5:302020-04-21T06:42:02+5:30

खनिज तेल बाजारात विक्रमी पडझड; अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होणार

Crude oil prices plunge below zero for first time in unprecedented wipeout | आर्थिक मंदीच्या भीतीने अमेरिकेत खनिज तेलाच्या दरात विक्रमी घसरण

आर्थिक मंदीच्या भीतीने अमेरिकेत खनिज तेलाच्या दरात विक्रमी घसरण

Next

कोरोना व्हायरसचा जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसला असून अमेरिकेतील वायदे बाजारात (फ्युचर ट्रेडस) खनिज तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण झाली आहे. पहिल्यांदाच खनिज तेलाच्या बॅरलची किंमत उणे (निगेटिव्ह) झाली आहे. याचा अर्थ खनिज तेल विकत घेण्यासाठी आता कंपन्या पैसे देण्यास तयार झाल्या आहेत. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर 1946 पासून प्रथमच तेलाची किंमत इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे.

बॅरलची किंमत त्यातील तेलापेक्षा जास्त असेल!
कोरोना व्हायरसची साथ आल्यापासून जागतिक आर्थिक बाजाराला बसलेला हा प्रचंड मोठा फटका आहे. खनिज तेलाच्या किमती इतक्या घसरल्या आहेत की तेल ठेवण्याच्या बॅरलची किंमत ही आतील तेलापेक्षा जास्त असेल. जगातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. कंपन्यांकडे आता तेलाचे साठेही ठेवण्यासाठी जागा नाही. कंपन्यांनी आपले १३ टक्के प्रकल्प बंद केले होते. याचे कारण म्हणजे तेल खरेदी करण्यासाठी कोणी पुढेच येत नाही. जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीने वायदे बाजारात तेल खरेदी करण्यास लोक घाबरत आहेत.
त्यामुळे कंपन्या तुम्हालाच तेल विकत घेण्यासाठी पैसे देतील.

अमेरिकेत वायदे बाजारात खनिज तेलाच्या किंंमती बॅरलला उणे ५१ डॉलर्स इतक्या झाल्या आहेत. त्यामुळे जे तेल विकत घेतील त्यांनाच पैसे देण्याची वेळ कंपन्यांवर आली आहे. 

आखाती देश, रशिया दिवाळखोरीत
सौदी अरेबियासह अनेक आखाती देशांची अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे. सौदी अरेबिया आणि रशियातील तेल युद्धामुळे तेलाचे दर अगोदरच कमी झाले आहेत. मात्र, आता ते प्रचंड कोसळल्यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहेत.

खनिज तेलाला जगात मागणीच नाही
कोरोना व्हायरसच्या जागतिक महामारीमुळे जगातील २०० कोटी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत. जगातील ६० टक्के वाहने रस्त्यावरून गायब आहेत. लोकांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विमानाची उड्डाणे थांबली आहेत. कारखाने बंद आहेत. त्यामुळे खनिज तेलाला मागणीच नसल्याचे चित्र आहे.

सामाजिक उद्रेकाची भीती
संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही तेलावर  अवलंबून असते. अमेरिकेपाठोपाठ जगातही तेलाच्या किंमती घसरल्यामुळे अनेक देश दिवाळखोरीत जाण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक उद्रेक होण्याचीही भीती आहे. अमेरिकेवर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अवलंबून आहेत. अमेरिकन शेअर बाजारातील कंपन्यांनी जवळपास सर्वच देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तेल कंपन्या दिवाळखोरीत गेल्यावर बँकांवरही त्याचा विपरित परिणाम होईल.  

भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता नाही
अमेरिका आणि जगातील सर्वच बाजारांत तेलाच्या किंमती कोसळल्या असल्या तरी भारतामध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर फरक पडणार नाही. पेट्रोल-डिझेल स्वस्तही होण्याची शक्यता नाही. याचे कारण गेल्या एक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे भारतातील वाहतूक संपूर्ण बंद आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी अगोदर घेतलेले तेलच विकले गेलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जुनाच साठा आहे.

भारतीय बाजाराला फटका बसण्याची भीती
अमेरिकेतील आर्थिक संकटाचा मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला बसण्याची भीती आहे. अमेरिका आणि जगातील इतर शेअर बाजार भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्रीपासूनच कोसळण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजार आणि निफ्टी यांच्यावरही होण्याची भीती आहे.

Web Title: Crude oil prices plunge below zero for first time in unprecedented wipeout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.