गेल्या काही दिवसांपासून जगभरातील विविध देशात सत्तापालटाची मालिकी सुरू आहे. या यादीतमध्ये आता पश्चिम आफ्रिकेमध्ये बेनिन या देशाचाही समावेश झाला आहे. रविवारी सैनिकांच्या एका गटाने अचानक टीव्हीवर लाईव्ह येत देशातील सरकार विसर्जित करण्याची घोषणा केली.
स्वत:ला मिलिट्री कमिटी फॉर रिफाऊंडेशन म्हणवून घेणाऱ्या या समुहाने देशातील राष्ट्रपती आणि सर्व घटनात्मक संस्थांना हटवण्याची घोषणा केली. या कमिटीने लेफ्टिनेंट कर्नल पास्कल टिग्री यांना आपला नवा प्रमुख नियुक्त केलं आहे.
१९९० मध्ये फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून बेनिनमध्ये अनेकदा सत्तांतर झालं आहे. मात्र असं असलं तरी १९९१ पासून देशामध्ये बऱ्यापैकी राजकीय स्थैर्य कायम होतं. बेनिनचे राष्ट्रपती तालोन २०१६ पासून सत्तेत होते. तसेच पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात ते पद सोडणार होते. त्यांचे उत्तराधिकारी मानले जात असलेले माजी वित्तमंत्री रोमुआल्ड वडाग्नी हे निवडणुकीत सर्वात आघाडीवर होते. तर विरोधी उमेदवार रेनॉड एगोब्जो यांना पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने त्यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने फेटाळली होती.
गेल्या महिन्यातच संसदेने राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांवरून वाढवून सात वर्षे केला होता. मात्र कार्यकाळांची मर्यादा दोन एवढीच ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे सत्तांतर बेनिनच्या राजकारणाला मिळालेलं नवं वळण असल्याचं मानलं जात आहे.