Coronavirus: रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी; डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी 'पेपर' सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:04 AM2020-05-08T00:04:54+5:302020-05-08T00:05:07+5:30

‘पेपर’ असं या रोबोटचं नाव. तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे.

Coronavirus: robotic coronary patient care; ‘Paper’ ready to reduce the burden on doctors | Coronavirus: रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी; डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी 'पेपर' सज्ज

Coronavirus: रोबोट घेणार कोरोना रुग्णांची काळजी; डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी 'पेपर' सज्ज

Next

जपान - कोरोना व्हायरसने शिस्तप्रिय जपानी समाजालाही घेरलंच. आजच्या घडीला जपानमध्ये १५,५५६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ५८५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जपानच्या लोकसंख्येत तरुणांपेक्षा ज्येष्ठांचे प्रमाण जास्त असल्याने तिथं खबरदारीही अधिक घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानमधील टोकियो शहरामध्ये एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणं दिसत नाहीत, पण त्यांना संसर्ग झालेला आहे असे रुग्ण आणि ज्यांच्यामध्ये मध्यम लक्षणं आहेत, अशा रुग्णांना दवाखान्यात न ठेवता वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिथल्या दवाखान्यांवरचा वाढता ताण कमी करणं आणि ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करणं असा यामागचा हेतू आहे. त्यासाठी टोकियो शहरातील पाच हॉटेल्स मिळून दहा हजार हॉटेल रुम्स तिथल्या सरकारने ताब्यात घेतल्या असून, त्या हॉटेल्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी दोन नर्स आणि एका डॉक्टरचीही नेमणूकही करण्यात येणार आहे. मात्र, या रुग्णांची त्या हॉटेल्समध्ये काळजी घ्यायला ‘रोबोट’ची नियुक्ती करण्यात आली आहे, हे विशेष.

‘पेपर’ असं या रोबोटचं नाव. तो या हॉटेलमधल्या रुग्णांच्या दिमतीला पांढरा सर्जिकल मास्क लावून हजर आहे. सॉफ्टबॅँक रोबोटिक्स नावाच्या कंपनीने बनविलेला हा रोबोट अनेक प्रकारची कामं करणार आहे. म्हणजे तो टॉकिंग रोबोट आहे. तो स्वागत कक्षात रुग्णांचं स्वागत करेल. त्यांना सांगेल, की मास्क निट लावा. ताप किती तपासला का, तो नोंदवून घ्या. मग गप्पाही मारेल, काळजी करू नका, लवकर बरे व्हाल. क्लिनिंग रोबोट म्हणूनही काम करेल, या रुग्णांच्या खोल्यांसह ते ज्या भागात राहतील त्या भागात सफाईचं काम रोबोट करेल. डायनिंग परिसरात सर्व्ह करायला, मदत करायला हजर राहील. आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हा रोबोट प्रत्येक रुग्णाची काळजी घेईल, त्याच्याकडे रुग्णाची सारी माहितीही असेल. रेड झोनमध्ये अधिकाधिक असे रोबोट वापरण्याचा जपान सरकारचा मानस आहे.

त्यामुळे तेथील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरचा ताण आणि त्यांना असलेला संसर्गाचा धोका कमी होईल. टोकियोतील एका हॉटेलमध्ये या पेपर रोबोटने टोकियोचे गर्व्हनर युरीको कोईके यांचं स्वागत केलं आणि कामाला सुरुवातदेखील केली आहे. यंत्रं माणसांचं जगणं सोपं करतात, याचं हे एक आणखी पुढचं पाऊल आहे या महामारीच्या संकटकाळातलं.

Web Title: Coronavirus: robotic coronary patient care; ‘Paper’ ready to reduce the burden on doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.