सिंगापूरच्या हॉटेलवर भारतीय चिमण्यांचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:51 AM2021-02-24T00:51:23+5:302021-02-24T00:51:56+5:30

आता जगभरात कोरोनाच्या कहरामुळे प्रवासाला बंदी असताना हे दोघे कलाकार एकत्र कसे आले, हा प्रश्न पडणं साहजिकच आहे.

Colors of Indian sparrows at a hotel in Singapore | सिंगापूरच्या हॉटेलवर भारतीय चिमण्यांचे रंग

सिंगापूरच्या हॉटेलवर भारतीय चिमण्यांचे रंग

Next

सिंगापूर स्टेट-नेशनमध्ये ‘लिटिल इंडिया’ नावाचा एक जिल्हा आहे. सिंगापूर नदीच्या पूर्वेला वसलेला हा जिल्हा नावाप्रमाणेच छोट्या भारताचे प्रतिनिधित्व करतो. या राज्यात भारतातून सिंगापुरात स्थलांतरित झालेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. म्हणूनच या जिल्ह्याला ‘लिटिल इंडिया’ हे नाव पडले.  तर या ‘लिटिल इंडिया’मध्ये अनेक कलाविष्कार सादर केले जात असतात. ते कधी स्वच्छंदी कलाकारांकडून केले जातात तर कधी त्याला राजाश्रय असतो.

एकूणच आपल्या कलेचा आविष्कार दाखविण्यासाठी हा जिल्हा कलाकारांना खुणावत असतो. अलीकडेच हा जिल्हा अशाच एका कलाविष्काराने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका सात मजली ब्रॉडवे हॉटेलवर २१ मीटर उंच भित्तीचित्र रेखाटण्यात आले असून त्यात गोंड आदिवासी चित्रकलेचा समावेश आहे.  झाडाच्या फांद्यांवर बसलेल्या रंगीबेरंगी चिमण्या आणि झाडाखाली उभी असलेली हरणांची जोडी या सर्वांना एकत्र गुंफणारी लाल रिबिन असं हे भित्तीचित्र - डान्सिंग इन युनिजन (एकता नृत्य) - आहे. भज्जू श्याम आणि सॅम लो या अनुक्रमे भारतीय आणि सिंगापुरी कलाकारांनी एकत्र येऊन हा कलाविष्कार घडवला आहे.

आता जगभरात कोरोनाच्या कहरामुळे प्रवासाला बंदी असताना हे दोघे कलाकार एकत्र कसे आले, हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. मात्र, संपर्काच्या आधुनिक तंत्रज्ञानाने या श्याम आणि लो यांना एकत्र आणले. त्यात महत्त्वाची भूमिका निभावली स्टार्ट इंडिया फाउंडेशन आणि सिंगापूर पर्यटन मंडळ या दोन संस्थांनी. या दोन्ही कलाकारांनी झूम, गुगल मीट या संपर्काच्या माध्यमांतून परस्परांशी संपर्क साधून आपल्याला नेमकं काय करायचंय हे स्पष्ट केलं. 

भज्जू आणि सॅम या दोन्ही कलाकारांची जातकुळी अगदीच भिन्न. भज्जू हे गोंड आदिवासी चित्रकलेचे पुरस्कर्ते. त्यांच्या कलांमधून ते सातत्यानं डोकावत असतं. शिवाय मध्य प्रदेशातील गोंड समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कलाकार. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. घराच्या भिंतींवर गोंड आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील चित्रं रेखाटणं हा भज्जू श्याम यांचा मुख्य छंद. भिंतींवर चित्रं रेखाटता रेखाटता ती मोठ्या कॅनव्हासवर गेली आणि तेथूनच श्याम यांना प्रसिद्धी मिळाली. आपल्या चित्रांतून बोलणारे भज्जू श्याम तसे मितभाषीच. पॅरिस, लंडन, मिलान आणि  हेग यांसारख्या नामांकित शहरांमध्ये श्याम यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरलेली आहेत. सॅम लो मात्र भज्जू श्याम यांच्यापेक्षा वेगळे. सिंगापुरात त्यांची ओळख व्हिज्युअल आर्टिस्ट अशी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जे दिसतं ते कागदावर हुबेहूब टिपणं, हा सॅम लो यांचा आवडता छंद. सिंगापुरातील भित्तीचित्राविषयी बोलताना भज्जू श्याम म्हणतात, “सॅम लो यांच्याबरोबर प्रथमच काम करायला मिळालं. कलेविषयीचा आमचा दृष्टिकोन वेगवेगळा असला तरी निसर्ग हा आमच्यातील समान धागा आहे.”

ब्रॉडवे हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या भित्तीचित्राविषयी श्याम आणि सॅम लो  सुमारे महिनाभर चर्चा करत होते.. थीम काय असावी, रंगसंगती कोणती असावी याविषयी बोलत होते. एकमेकांना स्केचेस पाठवत होते. लो यांनी पाठवलेल्या स्केचेसमध्ये  एक निळा आणि एक पिवळा अशा दोन रंगांतील झाडं पाहिल्यावर श्याम यांना गोंड चित्रकलेतील जलरंगांची आठवण झाली. निसर्गात अशी अनेक झाडं आहेत की ज्यांचं मानवी जीवनातील योगदान निव्वळ अद्भुत असं आहे. गोंड आदिवासींच्या जीवनात अशा झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाचे पूजक असलेल्या गोंड आदिवासींना वृक्षराजींविषयी खूप प्रेम असतं. या भित्तीचित्राच्या माध्यमातून श्याम यांना आपल्या गौंड संस्कृतीशी एकनिष्ठ राहायचं होतं. तसेच सिंगापूरमधील ‘लिटिल इंडिया’ जिल्ह्यात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या देशाची आठवण होईल, अशा कलेची निर्मिती करायची होती. त्यातूनच ही कलाकृती साकार झाली.

 चिमण्या हा भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांत सहजपणे आढळणारा पक्षी आहे. त्यामुळे चित्रांत त्यांची उपस्थिती उभय देशांमधील एकरूपतेचं प्रतीक  आहे. लाल रिबिनीचं महत्त्व म्हणजे लो यांनी सर्व जीव एका धाग्याने गुंफले गेल्याचं प्रतीकात्मकतेतून दर्शवलं आहे.  कोरोनाच्या प्रकोपामुळे सध्या प्रवासावर बरेच निर्बंध आहेत. त्यामुळे श्याम हे  स्वत: भित्तीचित्र रंगविण्यासाठी सिंगापूरला जाऊ शकले नाहीत. त्यांच्यातर्फे  हे काम लो आणि त्यांच्या गटानं केलं. जानेवारीच्या मध्यात ही कलाकृती पूर्ण झाली आणि आता या भित्तीचित्राला सिंगापूरच्या भारतीय समुदायामध्ये फार महत्त्वाचं स्थान मिळालं आहे!

सहजीवनाचं आनंदी चित्र

परस्परांवरील अवलंबित्व, सहवास, विभिन्न संस्कृतींतून आलेल्या लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या संस्कृतीचा आदर राखत सहजीवन जगणं या सर्व गोष्टी हे भित्तीचित्र अधोरेखित करतं, याचा मला अभिमान वाटतो!
- सॅम लो,  सिंगापूरमधील ख्यातनाम व्हिज्युअल आर्टिस्ट

Web Title: Colors of Indian sparrows at a hotel in Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.