क्रूरकर्म्याचा बालिशपणा! खबरदार, कुणी माझा कोट घालाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:22 AM2021-12-06T07:22:58+5:302021-12-06T07:23:20+5:30

एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात सिक्स पॅक्स ॲब्स दाखवले की जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते. एखाद्या फॅशन आयकॉन असणाऱ्या मॉडेलने एखाद्या प्रकारचा फ्रॉक घातला की, बाजारात तशा फ्रॉक्सचे ढीग लागतात.

Childishness of cruelty! Beware, if someone wears my coat ...Article on Kim Jong Un | क्रूरकर्म्याचा बालिशपणा! खबरदार, कुणी माझा कोट घालाल तर...

क्रूरकर्म्याचा बालिशपणा! खबरदार, कुणी माझा कोट घालाल तर...

Next

प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीचे जगभर चाहते असतात. हे चाहते त्यांच्या त्यांच्या आयकॉनच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून असतात. त्यांच्या आयकॉनच्या प्रत्येक वागण्याला त्यांचा पाठिंबा असतो. आपले आयकॉन कसे राहतात, काय घालतात, हे त्यांचे चाहते फॉलो करत असतात. त्यांची नवीन स्टाइल दिसली रे दिसली की, चाहत्यांनाही ती फॉलो करायची असते. मग त्यासाठी ते कितीही कष्ट घ्यायला किंवा खर्च करायला तयार असतात; पण तरीही चाहते त्यांचा चिकित्सकपणा पूर्ण गुंडाळून बाजूला ठेवत नाहीत. अगदी किम कर्दाशियनलासुद्धा तिच्या चाहत्यांनी ट्रोल केलेले आहे; पण जनरली फॅन्स हे त्यांच्या आयकॉनच्या अनेक गोष्टी फॉलो करतात.

एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात सिक्स पॅक्स ॲब्स दाखवले की जीममध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते. एखाद्या फॅशन आयकॉन असणाऱ्या मॉडेलने एखाद्या प्रकारचा फ्रॉक घातला की, बाजारात तशा फ्रॉक्सचे ढीग लागतात. अर्थातच या सगळ्या आयकॉन्सना आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी बऱ्यापैकी कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांची मोठी टीम काम करत असते. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी ते पैसे खर्च करत असतात आणि त्या लोकप्रियतेतून पैसे कमावत असतात; पण हे झाले आपले रेग्युलर, साधेसुधे कमर्शिअल आयकॉन्स! 
- पण काही आयकॉन्स असे असतात ज्यांना अशी लोकप्रियता ‘मिळवावी’ लागत नाहीत, तर त्यांनी एक आदेश काढला की, त्यांचे प्रजाजन जिवाला घाबरून ताबडतोब त्यांना ती लोकप्रियता देऊन टाकतात. अशी हुकमी (!) लोकप्रियता लाभलेल्या सध्याच्या नावांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे किम जोंग उन.

तेच ते... उत्तर कोरियाचे हुकूमशहा. त्यांच्या देशातील सर्व नागरिकांना त्यांचे चाहते आणि अनुयायी असणे हे कम्पल्सरीच आहे. किम जोंग उन जे म्हणतील ते कायम योग्यच असते. ते करतील ती वेशभूषा आणि केशभूषा ही जगातील सर्वोत्तम स्टाइल असते आणि उत्तर कोरियाच्या नागरिकांनी ती स्वखुशीने फॉलो करण्याचे त्यांच्यावर ऑलमोस्ट बंधनच आहे. उदाहरणार्थ, किम जोंग उनचा सध्याचा हेअरकट बघितला, तर कोणीही सौंदर्यदृष्टी असणारा माणूस तो कॉपी करणार नाही; पण तरीही उत्तर कोरियातील लोकांवर तो हेअरकट कॉपी करण्याचा अदृश्य दबाव होता. म्हणजे तो हेअरकट कॉपी केला नाही तर थेट मृत्युदंड, असा काही मामला नव्हता (हे महाशय तेही करू शकतात; पण त्यांनी ते केले नव्हते); पण आपणहून असा हेअरकट करणाऱ्याच्या निष्ठा वादातीत आहेत, असे काहीसे गृहीतक या अदृश्य दबावाखाली होते. अर्थात, उत्तर कोरियाच्या नागरिकांना अशा अनेक दृश्य- अदृश्य दबावांची सवय आहे. हे दबाव आणि भय हे त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे अनेकांनी किम जॉन उन यांचा तो तपेला हेअरकट कॉपी केला. आपल्या देशाच्या नागरिकांनी आपल्याला फॉलो करावे, आपली कॉपी करावी ही किम जोंग उन यांची इच्छा यावेळी कधी नाही ते आपणहून आणि खरोखर लोकांच्या राजीखुशीने पूर्ण होऊ लागली.

किम जोंग उन यांनी डिसेंबर २०१९ पासून एक लेदरचा ट्रेन्च कोट वापरायला सुरुवात केली. एरवी मनाला येईल ते करण्याच्या मानाने हा कोट ाखरोखरच चांगला दिसत होता. तो स्टाइलच्या व्याख्येतही बसत होता. साहजिकच लोकांनी आपल्या राष्ट्राध्यक्षाला बघून तसा कोट विकत घेऊन वापरायला सुरुवात केली. उत्तर कोरियाच्या नागरिकांच्या दृष्टीने बघितले, तर ती काही सोपी गोष्ट नव्हे. कारण त्या देशाचे दरडोई उत्पन्न काही विशेष नाही. त्यात हा कोट होता लेदरचा. त्यामुळे त्याची किंमत काही कमी नव्हती; पण तरीही नागरिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रेम-भयापोटी पैसे साठवून तो कोट विकत घेऊन वापरायला सुरुवात केली.

इतके सर्व सुरळीत होतेय आणि ते होऊ दिले तर ते किम जोंग उन कसले? यावेळी त्यांना असे वाटले की लेदरचा ट्रेन्च कोट ही त्यांची युनिक स्टाइल आहे आणि ती युनिकच राहिली पाहिजे. संपूर्ण देशाने जर का त्यांच्यासारखे कपडे घालायला सुरुवात केली तर त्या कपड्याचा गणवेश होऊन जाईल आणि मग त्यांचे वेगळेपण त्यात काही उरणार नाही. असे वाटून, लोकांनी आपल्याला फॉलो केले पाहिजे या नियमावरून चक्क यू टर्न घेऊन या राष्ट्राध्यक्ष साहेबानी चक्क लोकांना असा कोट घालायला बंदी घातली आहे. पोलीस असा कोट घातलेल्या लोकांना पकडून त्यांचे कोट जप्त करणे किंवा त्यांना दंड किंवा शिक्षा करणे या उद्योगात सध्या गुंतलेले आहेत.

क्रूरकर्म्याचा बालिशपणा 
एखादा राज्यकर्ता एकाच वेळी बालिश आणि क्रूर असतो त्यावेळी त्या देशातील नागरिकांचे आयुष्य किती कठीण होऊन जाते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उत्तर कोरिया! आता किम जोंग उन पुढची स्टाइल काढतील तेव्हा ती फॉलो करायची की नाही हे उत्तर कोरियन नागरिकांनी कसे बरे ठरवायचे?

Web Title: Childishness of cruelty! Beware, if someone wears my coat ...Article on Kim Jong Un

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.