५० कोटी डॉलर्ससाठी घात; दुबईच्या वाळवंटात क्रिप्टो उद्योजकासह पत्नीची निर्घृण हत्या, पुरलेले मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:44 IST2025-12-02T14:25:50+5:302025-12-02T14:44:14+5:30
रशियन क्रिप्टो उद्योजक रोमन नोवाक आणि पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

५० कोटी डॉलर्ससाठी घात; दुबईच्या वाळवंटात क्रिप्टो उद्योजकासह पत्नीची निर्घृण हत्या, पुरलेले मृतदेह सापडले
Russian Crypto Couple Found Dead:रशियातील वादग्रस्त क्रिप्टो उद्योजक रोमन नोवाक आणि त्यांची पत्नी अॅना नोवाक यांचे मृतदेह संयुक्त अरब अमिरातीमधील एका निर्जन वाळवंटी भागात सापडले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून हे दोघे बेपत्ता होते. फसवणुकीचा आरोप सिद्ध झालेल्या या उद्योजकाच्या हत्येमुळे आंतरराष्ट्रीय क्रिप्टो जगतात खळबळ माजली आहे.
रोमन नोवाक हे सेंट पीटर्सबर्ग येथील असून त्यांनी स्थापन केलेल्या फिंटोपिओ नावाच्या क्रिप्टो ट्रान्सफर प्लॅटफॉर्मने मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांचे आर्थिक करिअर वादांनी भरलेले होते. २०२० मध्ये त्याच्यावर रशियात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यात शिक्षा भोगल्यानंतर ते दुबईत स्थलांतरित झाले होते. ते बेपत्ता होण्यापूर्वी, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले सुरू होते. काही अहवालानुसार, त्यांच्याविरुद्ध तब्बल ५० कोटी डॉलर्स (सुमारे ४,१५० कोटी रुपये) लाटल्याचे दावे करण्यात आले होते.
हट्टा येथील 'गुप्त' बैठकीत घात
रशियन माध्यमांनुसार, नोवाक दाम्पत्य २ ऑक्टोबर रोजी शेवटचे दिसले होते. ओमान सीमेजवळ असलेल्या हट्टा परिसरातील एका तलावाजवळ एका चालकाने त्यांना सोडले. त्यानंतर एका गुंतवणूकदारासोबत बैठक असल्याच्या बहाण्याने ते एका दुसऱ्या वाहनात बसले आणि तिथून गायब झाले. पोलिसांनी सांगितले की, एका कथित व्यावसायिक कराराच्या खोट्या बहाण्याने नोवाक दाम्पत्याला एका भाड्याच्या व्हिलामध्ये फूस लावून बोलावण्यात आले. तिथे त्यांचा निर्घृण छळ करण्यात आला. हल्लेखोरांचा उद्देश त्यांच्या डिजिटल क्रिप्टो वॉलेट्सचा अॅक्सेस मिळवणे हा होता. वॉलेट्सचा अॅक्सेस न मिळाल्याने अपहरणाचा हा प्रयत्न फसल्याने हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.
रोमन नोवाक आणि त्यांची पत्नी अण्णा नोवाक यांचे मृतदेह ३ ऑक्टोबर रोजी दुबईजवळील एका वाळवंटात विखुरलेले आणि पुरलेले आढळले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हे जोडपे बेपत्ता होते, नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क तुटल्यानंतर महिनाभरापासून त्यांचा शोध सुरू होता. त्यांना शेवटचे ओमान सीमेजवळ दिसले होते. आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील केपटाऊन येथे क्रूरपणे नेण्यापूर्वी आणि ४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता होण्यापूर्वी मोबाईल सिग्नलने जोडप्याला हट्टा आणि ओमानमध्ये शोधले होते. तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी सिग्नलमध्ये बदल करण्यात आले होते.
रशियात संशयित अटकेत
नोव्हेंबरमध्ये या दाम्पत्याचे मृतदेह मिळाल्यानंतर तपास वेगाने सुरू झाला आणि हत्येच्या आरोपावरून अनेक संशयितांना रशियातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले संशयित सर्व रशियन नागरिक आहेत. तपास यंत्रणा या दुहेरी हत्येच्या संपूर्ण परिस्थितीचा छडा लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. ५३ वर्षीय कॉन्स्टँटिन शाख्त हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. त्याने आरोपांचे खंडन केले असले तरी, इतर दोन संशयितांनी हत्येची कबुली दिली आहे.
सुरुवातीला खंडणी किंवा चोरीचा हा कट होता, पण हल्लेखोरांना डिजिटल निधीचा अॅक्सेस मिळाला नाही, त्यामुळे हा कट फसून त्याचे रूपांतर हत्येत झाले, असा अंदाज काही सूत्रांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिप्टो समुदायात मोठे आश्चर्य आणि भीतीचे वातावरण पसरले आहे, कारण या हाय-प्रोफाइल हत्येमुळे क्रिप्टोकरन्सीशी संबंधित गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.