Amazon Rainforest Fire : जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 10:00 AM2019-08-24T10:00:08+5:302019-08-24T10:13:59+5:30

जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे.

Amazon rainforest fire: Lungs of our planet burning with 99% fires started by humans | Amazon Rainforest Fire : जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

Amazon Rainforest Fire : जगातील सर्वात घनदाट जंगलाला भीषण आग

googlenewsNext
ठळक मुद्देजगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे. सर्वाधिक नुकसान ब्राझीलचे झाले असून तेथील 2 हजार 700 किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे.जगात 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करणारे अ‍ॅमेझॉन जंगल होरपळत असून अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही.

ब्राझीलिया - जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलाला लागलेल्या आगीमुळे शहरात प्रचंड अंधार झाला आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलचे झाले असून तेथील 2 हजार 700 किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेते आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करते. मात्र सध्या हे वर्षावन आगीने धुमसतंय. यामुळेच ट्विटरवर  #PrayForTheAmazon आणि #AmazonRainforest हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

जगात 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करणारे अ‍ॅमेझॉन जंगल होरपळत असून अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही. ही आग आणखी वाढल्यास जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने ती धोक्याची ठरू शकते. यासाठी नेटकऱ्यांनी अ‍ॅमेझॉन जंगलाला वाचवण्यासाठी मोहीम सुरू करत मदतीचे आवाहन केले आहे. बॉलिवूड स्टार्सनेही अ‍ॅमेझॉनमधील आगीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आगीमुळे निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार वायव्येतील या जंगलांमध्ये लागल्याने आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील रिओ दी जनेइरोपर्यंत धूर पसरला आहे. 

जैवविविधता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या सदाहरित जंगलाच्या चिंतेने सध्या बॉलिवुडकरांना ग्रासले आहे. या जंगलात लागलेली भीषण आग हे यामागचे कारण आहे. खरे तर याआधीही या जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत. पण सध्याची आग इतकी भीषण आहे की, ब्राझीलचे साओ पाउलो धुरामुळे अंधारात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी अ‍ॅमेझॉनमधील आगीचा फोटो शेअर करत, चिंता व्यक्त केली आहे. ‘अ‍ॅमेझॉनचे जंगल आठवडाभरापासून आगीने धुमसते आहे. ही धडकी भरवणारी बातमी आहे. मीडियाने याकडे लक्ष देईल, अशी आशा आहे,’ असे त्यांनी लिहिले आहे.

अभिनेता अर्जुन कपूर यानेही ट्विट केले आहे. ‘अ‍ॅमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आग... याचा जगाच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा विचारही करवत नाही. अतिशय दु:खद,’ असे त्याने लिहिले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत या जंगलात 39, 759 आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूड  फॉर स्पेस रिसर्चने यावर चिंता व्यक्त केली होती. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात आगीचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. अ‍ॅमेझॉन वर्षावनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझील देशात आहे. त्यानंतर पेरू, कोलंबिया, व्हेनेज्युएला, इक्वेडोअर, बोलिविया सुरूनेम यांसारख्या देशांत या वर्षावनाचा भाग आहे. 


 

Web Title: Amazon rainforest fire: Lungs of our planet burning with 99% fires started by humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.