'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:38 IST2025-06-10T20:31:28+5:302025-06-10T20:38:46+5:30
युनूस यांनी हा प्लॅन जमात ए इस्लामी आणि जातीय नागरीक पार्टीच्या काही नेत्यांसोबत मिळून बनवला होता.

'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
ढाका - बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस सध्या अनेक पातळीवर समस्यांचा सामना करत आहेत. राजकीय पक्षांसोबत त्यांचे सैन्य प्रमुखांसोबत पटत नाही तर सर्वसामान्य लोकांमध्येही त्यांच्याविरोधात नाराजी पसरली आहे. त्यातच सरकारवरील लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांना ही माहिती लीक झाली आणि त्यांनी युनूस यांचा प्लॅन अयशस्वी केला.
बांगलादेशातील सैन्य प्रमुखाने मोहम्मद युनूस यांचा भारतासोबत संघर्ष करण्याचा डाव उधळून लावला. युनूस यांनी हा प्लॅन जमात ए इस्लामी आणि जातीय नागरीक पार्टीच्या काही नेत्यांसोबत मिळून बनवला होता. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे सैन्य प्रमुखाने कठोर भूमिका घेतली. मोहम्मद युनूस यांच्या भारतासोबत तणाव वाढवण्याच्या प्लॅनमध्ये नॅशनल सिक्युरिटी एडवायजर खलीलुर्रहमान आणि ISI निकटवर्तीय क्वार्टर जनरल लेफ्टिनेंट मोहम्मद फैजुर्रहमान सोबत होते. ही योजना मागील महिन्यात बनवण्यात आली होती जेव्हा भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. स्वराज्यमग यांनी त्यांच्या रिपोर्टमधून हा दावा केला आहे.
बॉर्डर गार्ड्स बांगलादेश(BGB) सीमेवर आक्रमक पवित्रा घेण्याची ही योजना होती. त्यामुळे भारतासोबत सीमेवर तणाव वाढला असता. भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससोबत काही तणाव निर्माण झाला असता. या प्लॅनिंगमध्ये BGB सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी सीमेवर सैन्याचे काही युनिटही तैनात करण्याची योजना होती असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सैन्य प्रमुख जनरल वकार उज जमां यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी BGB महासंचालकांना आक्रमक भूमिका घेणे आणि भारताला उकसवण्याबाबत फटकारले. BGB प्रमुखांनी हे करण्यासाठी मला मोहम्मद युनूस यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयातून मौखिक आदेश मिळाल्याचे जनरल जमां यांना सांगितले असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
सैन्य प्रमुखांनी घेतली बैठक
जनरल जमां यांनी हा प्लॅन उघड झाल्यावर चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टिनंट जनरल मिजानुर्रहमान शमीम, एअर चीफ मार्शल महमूद खान आणि एडमिरल नजमुल हसन यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत सर्व प्रमुखांनी युनूस यांच्या योजनेचा कडाडून विरोध केला. त्यानंतर सैन्य प्रमुखाने युनूस आणि NSA यांना संदेश पाठवून हा प्लॅन मुर्खतेचा आहे. आम्ही सीमेवर भारताला उकसवण्याचा तीव्र विरोध करतो असं सांगितले.
काय म्हणाले जनरल जमां?
जनरल जमां यांनी NSA आणि मोहम्मद युनूस यांना संदेश पाठवला. त्यात भारताविरुद्ध युद्धाची परिस्थिती निर्माण करणे धोक्याचे आहे. सीमेवर जर परिस्थिती बिघडली तर नियंत्रणाबाहेर होईल. सीमेवर सैन्य तैनात न करण्याचे आदेश देत BGB लाही आदेश न देण्यास सांगितले. जमां यांच्या या पावित्र्यानंतर युनूस यांचा प्लॅन फेल झाला.