अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:06 IST2025-12-07T10:06:13+5:302025-12-07T10:06:48+5:30
भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ समुद्र असूनही, सुदैवाने अद्याप कोणतीही त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
अलास्का आणि कॅनडाच्या सीमेजवळ शनिवारी रात्री ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याने परिसरात मोठी दहशत पसरली. भूकंपाचे जोरदार धक्के दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या प्रदेशात जाणवले. या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ समुद्र असूनही, सुदैवाने अद्याप कोणतीही त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनुसार, अलास्कातील जूनो शहरापासून सुमारे ३७० किलोमीटर (२३० मैल) वायव्येस आणि कॅनडाच्या युकोन प्रदेशातील व्हाइटहॉर्स शहरापासून २५० किलोमीटर (१५५ मैल) अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
भूकंपामुळे अलास्का आणि कॅनडाच्या युकोन भागात तीव्र झटके जाणवले. या भूभागात लोकसंख्या तुलनेने कमी असली तरी, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. अनेक ठिकाणी घरात कपाटातील वस्तू आणि भिंतींवरील सामान खाली पडल्याच्या घटना घडल्या. भूकंपाच्या धक्क्यामुळे घाबरलेल्या लोकांनी त्वरित सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र भूकंप असूनही कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.