जगात ३ महिन्यांत ओमायक्रॉनचे ३ अब्ज नवे रुग्ण?; ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:17 AM2022-01-15T10:17:54+5:302022-01-15T10:18:01+5:30

ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष; अमेरिका, आशिया खंडात रुग्ण वाढणार

3 billion new omycron patients worldwide in 3 months? | जगात ३ महिन्यांत ओमायक्रॉनचे ३ अब्ज नवे रुग्ण?; ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष

जगात ३ महिन्यांत ओमायक्रॉनचे ३ अब्ज नवे रुग्ण?; ब्रिटनमधील पाहणीचा निष्कर्ष

Next

लंडन : ओमायक्रॉन संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असूून, जगभरात येत्या तीन महिन्यांत या विषाणूमुळे आणखी तीन अब्ज लोक बाधित होतील, असा ब्रिटनमधील एका वै्द्यकीय पाहणीचा निष्कर्ष आहे. युरोप तसेच उत्तर अमेरिकेत तसेच आशिया खंडात या विषाणूचे रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

आफ्रिका खंडामध्ये ओमायक्रॉनच्या बाधितांची संख्या नुकतीच वेगाने वाढली होती. २०२२ च्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के जनतेला लस मिळणे आवश्यक आहे. तरच कोरोनाची साथ आटोक्यात येऊ शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिका खंडामध्ये ८५ टक्के लोकांना अद्याप लसच मिळालेली नाही. ओमायक्रॉन हा कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा कमी घातक असला, तरी कोरोना लस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

लसींच्या वाटपाबद्दल असलेली विषमता कोरोना संसर्ग वाढण्यास पूरक ठरते आहे. त्यावर जगातील सर्व देशांनी तातडीने तोडगा काढला पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.  लस घेतलेल्यांच्या तुलनेत एकही लस न घेतलेल्या लोकांना कोरोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. प्रसंगी त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने प्राधान्याने लस घ्यावी, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

जगभरात ३२ कोटी १२ लाख रुग्ण
जगभरात कोरोनाचे ३२ कोटी १२ लाख रुग्ण असून, त्यातील २६ कोटी ४३ लाख लोक बरे झाले. ५५ लाख ४१ हजार जणांचा मृत्यू झाला; तर ५ कोटी १३ लाख सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ९६ हजार लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. जगात अमेरिकेत सर्वाधिक ६ कोटी ५२ लाख रुग्ण असून, तिथे ८ लाख ६९ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्णसंख्येबाबत अमेरिकेनंतर भारत व ब्राझीलचा क्रमांक लागतो. 

आफ्रिकेतील चौथी लाट ओसरली

  • आफ्रिकेत कोरोनाची आलेली चौथी लाट सहा आठवड्यांनंतर ओसरली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 
  • ओमायक्रॉन हा नवा विषाणू आफ्रिका खंडातच पहिल्यांदा आढळून आला व नंतर जगभर पसरला. 
  • दक्षिण आफ्रिकेत या विषाणूमुळे काही आठवड्यांपूर्वी आलेल्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती; मात्र डेल्टा विषाणूने जितके नुकसान केले तितके नव्या विषाणूने केलेले नाही. 

Web Title: 3 billion new omycron patients worldwide in 3 months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.