Lokmat Infra Conclave: ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये दिसला राज्याच्या ‘विकासाचा महामार्ग’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 07:10 AM2021-12-09T07:10:04+5:302021-12-09T07:10:33+5:30

२०२५ पर्यंत महाराष्ट्र विकासाच्या नकाशावर नेमका कुठे असेल हे अत्यंत प्रभावी अशा सादरीकरणाच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. गंभीरपणे प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपापल्या विभागाची विकासाच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड मांडत होते.

Lokmat Infra Conclave reveals state's 'highway of development' | Lokmat Infra Conclave: ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये दिसला राज्याच्या ‘विकासाचा महामार्ग’

Lokmat Infra Conclave: ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये दिसला राज्याच्या ‘विकासाचा महामार्ग’

googlenewsNext

मुंबई : राज्यात येत्या दोन वर्षांत ५ लाख कोटींची गुंतवणूक येणार, त्यातील ३ लाख कोटींची गुंतवणूक एकच कंपनी करणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. नागपूर ते शिर्डी असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा येत्या दोन महिन्यांत प्रवासासाठी खुला होणार असून, हा महामार्ग गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत जाणार, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

मुंबईच्या कोस्टल रोडवरून डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबईकर वेगाने प्रवास करू शकतील, असा विश्वास पर्यटन मंत्री व  मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. यापुढे म्हाडातर्फे एकेक इमारतीचा नव्हे तर, संपूर्ण लेआउटचा विकास केला जाणार, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्याचवेळी राज्यातील शेतकऱ्यांना आता स्वत:च्या शेतातील पिकांचा फोटो मोबाइलवर काढून थेट सरकार दरबारी नोंदविता येईल, अशी घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. घोषणांचा हा पाऊस झाला तो ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये..!

लोकमत समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विकास परिषदेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री आणि आय. एस. चहल, भूषण गगराणी, मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, सोनिया सेठी, डॉ. संजय मुखर्जी, राधेश्याम मोपलवार, पी. अनबलगन हे आठ वरिष्ठ सनदी अधिकारी, डॉ. बिपीन शर्मा, विजय सूर्यवंशी, अभिजित बांगर, राधाकृष्णन बी. हे चार महापालिकांचे आयुक्त आणि शिर्डी संस्थान देवस्थानच्या प्रमुख भाग्यश्री बानायत अशा १३ अधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप’ राज्यातील जनतेसमोर मांडला. २०२५ पर्यंत महाराष्ट्र विकासाच्या नकाशावर नेमका कुठे असेल हे अत्यंत प्रभावी अशा सादरीकरणाच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. गंभीरपणे प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपापल्या विभागाची विकासाच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड मांडत होते. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी २०२५ चा महाराष्ट्र कसा असेल, याचा अत्यंत अभ्यासू लेखाजोखा मांडला. लोकमत मीडियाचे सह व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांची मुलाखत घेतली.

आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल कशी महत्त्वाची आहे, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी. त्याचवेळी त्यांनी प्रकल्प वेळेवर पूर्ण झाले नाहीत तर काय अवस्था होऊ शकते हे उदाहरणांसह मांडले. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे स्वप्न, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची सुस्पष्ट दिशा आणि रस्ते, गृहनिर्माण, मेट्रो, स्वच्छता या सुविधांसाठी झटणाऱ्या दमदार अधिकाऱ्यांची फळी यांचे प्रभावी दर्शन लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये बुधवारी पाहायला मिळाले.

कोस्टल रोडपासून ते शिवडी-न्हावा शेवा लिंकपर्यंत आणि समृद्धी महामार्गापासून ते नवी मुंबईच्या विमानतळापर्यंत एकेक प्रकल्पाचे सुस्पष्ट सादरीकरण या परिषदेत करण्यात आले. मुंबईसह नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांनी त्यांच्या शहरांची विकासपथावरील वाटचाल एखाद्या कवितेसारखी सादर केली. एवढेच नव्हेतर, उपस्थित गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, कंत्राटदार यांना आपापल्या शहरात येण्याचे, काम करण्याचे आवाहनही या आयुक्तांनी मोकळेपणाने केले. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर व लोकमतचे प्रेसिडेंट करुण गेरा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाच अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दलची माहिती लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

Web Title: Lokmat Infra Conclave reveals state's 'highway of development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत