पदक पटकावण्यास भारतीय उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:44 AM2018-11-28T06:44:25+5:302018-11-28T06:44:33+5:30

भुवनेश्वर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय हॉकी संघ कलिंगा स्टेडियममध्ये मायदेशातील प्रेक्षकांपुढे बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरेल त्यावेळी त्यांचा निर्धार ...

Indian eager to win the medal | पदक पटकावण्यास भारतीय उत्सुक

पदक पटकावण्यास भारतीय उत्सुक

Next

भुवनेश्वर : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय हॉकी संघ कलिंगा स्टेडियममध्ये मायदेशातील प्रेक्षकांपुढे बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी उतरेल त्यावेळी त्यांचा निर्धार विश्वचषक स्पर्धेमध्ये ४३ वर्षांपासून पदक न मिळाल्याचे शल्य विसरण्याचा राहील.


आठवेळा आॅलिम्पिक चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाने १९७५ मध्ये एकमेव विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अजितपाल सिंग आणि त्याच्या संघाने इतिहास घडवला होता. ‘क’ गटातील लढतीत यजमान भारत बुधवारी आपल्या माहिमेची सुरुवात करेल.
१९७५ नंतर आशियातील दिग्गज भारतीय संघाला नेदरलँड, जर्मनी आणि आॅस्ट्रेलिया या संघाची बरोबरी साधण्यात अपयश आले. गेल्या चार दशकांत युरोपियन संघांनी विश्व हॉकीवर वर्चस्व कायम राखले आहे.


भारताने १९७५ नंतर सर्वोत्तम कामगिरी मुंबईमध्ये १९९२ मध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत केली होती. त्यावेळी भारतीय संघ पाचव्या स्थानी होती. गेल्या ४३ वर्षांत भारतीय संघाला विश्वकप स्पर्धेत पदक पटकावता आलेले नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ यावेळी पदक पटकावत ती उणीव भरून काढण्यास उत्सुक आहे. भारतासाठी मात्र हे सोपे नाही. कारण त्यांना दोनवेळचा गतचॅम्पियन आॅस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी आणि आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना यांच्यासारख्या दिग्गज संघाचे आव्हान राहणार आहे. याव्यतिरिक्त यजमान संघावर अपेक्षांचे दडपणही राहणार आहे.


दोन वर्षांपूर्वी लखनौमध्ये ज्युनिअर संघाला विश्वविजेतेपद पटकावून देणारे प्रशिक्षक हरेंद्र यांना आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक कायम राखता आले नाही. त्यांच्यासाठी स्पर्धेत करा अथवा मरा अशी स्थिती आहे. संघाने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांचे प्रशिक्षकपद जाण्याची शक्यता आहे.

क गटात भारतापुढे बेल्जियम, कॅनडा यांचे आव्हान
हरेंद्र यांनी विश्वकप विजेता ज्युनिअर संघातील सात खेळाडूंना सध्याच्या संघात संधी दिली आहे. त्याचसोबत कर्णधार मनप्रीत सिंग, पी.आर.श्रीजेश, आकाशदीप सिंग आणि बीरेंद्र लाकडा हेसुद्धा संघात आहेत. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगला संघातून वगळण्यात आले आहे तर स्टायकर एस.व्ही. सुनील फिटनेसच्या कारणास्तव संघाबाहेर आहे. १६ देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम आणि कॅनडा यांचा ‘क’गटात समावेश आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमविरुद्ध भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल. दक्षिण आफ्रिका संघ मानांकनात १५ व्या तर कॅनडा ११ व्या स्थानी आहे.

Web Title: Indian eager to win the medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.