हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:11 AM2019-09-29T04:11:28+5:302019-09-29T04:11:52+5:30

गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली.

Hockey Series: Indian women's team defeats Great Britain | हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

Next

मारलो : गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली.
भारतीय संघ ०-१ गोलने पिछाडीवर पडला होता; परंतु त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त मुसंडी मारताना शर्मिला देवी आणि गुरजित यांच्या गोलच्या बळावर विजय मिळविला.
पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंनी गोल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला; परंतु त्यात यश मिळाले नाही. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने सामन्यात वर्चस्व राखताना दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले; परंतु प्रतिस्पर्धी संघाची गोलरक्षक मॅडी हिंच हिने त्याचा शानदार बचाव केला.
ग्रेट ब्रिटनने आणखी एका सुरेख संधीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय गोलरक्षक सविता पुनिया हिने त्यांच्या आशेवर पाणी फेरताना त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे पहिला हाफ गोलरहित राहिला.
अखेरच्या क्वॉर्टरमध्ये पहिल्याच मिनिटाला ग्रेट ब्रिटनच्या एमिली डेनफ्रोडने संधीचा फायदा घेताना ४६ व्या मिनिटाला आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढविला आणि त्याचे फळ संघाला लगेच मिळाले. शर्मिलाने केलेल्या गोलच्या बळावर भारताने १-१ अशी बरोबरी साधली.
सामना अनिर्णीत राहणार अशीच चिन्हे होती; परंतु सामना संपण्यास अवघे ४८ सेकंद बाकी असताना भारताने शॉर्ट कॉर्नर मिळविला आणि याचे गुरजितने गोलमध्ये रूपांतर करीत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा सामना आज, रविवारी खेळविला जाणार आहे.

भारताची स्पेनवर ६-१ ने मात
एंटवर्प (बेल्जियम) : भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली शानदार कामगिरी सुरुच ठेवत शनिवारी स्पेनला ६-१ अशा गोलफरकाने पराभूत केले. हरमनप्रित सिंगने दोन गोल केले.
हरमनप्रितशिवाय मनप्रित सिंग, निलकंठ शर्मा, मनदीप सिंग व रुपिंदरपाल सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी स्पेनवर वर्चस्व राखले. मध्यंतरापर्यंत भारताकडे २ - १ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही आक्रमक खेळ करत विजय मिळवला.


 

Web Title: Hockey Series: Indian women's team defeats Great Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.