वसमतमध्ये वाळूचोरीसाठी मालवाहू गाड्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 03:05 PM2020-11-12T15:05:28+5:302020-11-12T15:07:21+5:30

तब्बल ८ वाहनांवर तहसीलदारांकडून कारवाई

Use of freight vehicles for sand theft in Wasmat | वसमतमध्ये वाळूचोरीसाठी मालवाहू गाड्यांचा वापर

वसमतमध्ये वाळूचोरीसाठी मालवाहू गाड्यांचा वापर

Next
ठळक मुद्देवसमत तालुक्यात वाळू वाहतुक करणाऱ्या अनेक टोळ्या उदयास आल्या आहेत.

वसमत : तालुक्यातील वाळू चोरट्यांविरोधात वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दाेन दिवस धडक मोहीम राबवून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ८ छोटा हत्ती वाहनांवर कारवाई करून जप्त केली आहेत. वाळू वाहतुकीसाठी मालवाहू वाहने वापरत असल्याचे धक्कादायक चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. तालुक्यातील किन्होळा परिसरातील आसना नदीतून ही वाहने वाळू उत्खनन करत होते.

वसमत तालुक्यात वाळू वाहतुक करणाऱ्या अनेक टोळ्या उदयास आल्या आहेत. हट्टा मंडळामधील पूर्णा नदीघाट वाळू माफियांच्या तावडीतच सापडल्याचे चित्र आहे. तीन वर्षांपासून नदी घटांचे लिलाव झालेले नाहीत. याचा फायदा घेत अनेक वाळूमाफिया मालामाल झाले आहेत. महसुली नाही तर वसुली पथकांच्या आशीर्वादाने राजरोसपणे महसूल बुडविण्याचा प्रकार सुरू आहे. घाटाचे लिलाव न झाल्याने रॉयल्टी भरण्याचे काम नाही, मात्र डायरी परमिट हा नवा शोध चोरट्यांनी लावला. त्यास अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. हट्टा परिसरातील नदी घाटांवर पोकलेन, टिप्पर, हायवा आदी वाहने आढळून येत आहेत. हट्टा बसस्थानक भागात वाळू चोरणाऱ्या काही जणांचा अड्डा झाला असल्याची माहिती आहे. पोलीस अधूनमधून कारवाई करतात. मात्र पुन्हा वाळू चोरटे उपसा करतात. वाळूमाफियांना भीती राहिली नसल्याने पोलीस पथकावरसुध्दा हल्ला करण्याच्या घटना घडतात.
वसमत तहसीलदार अरविंद बोळंगे हे रुजू झाले, तेव्हापासून वाळू चोरीविरोधात कारवाईसाठी सक्रिय पथक तैनात करण्यात आले. पथकासोबत खुद्द तहसीलदार राहत असल्याने धडक कारवाई होत आहे.

सोमवारी हट्टा मंडळ भागातून येणारे टिप्पर,  आसेगाव भागातील वाळू घेऊन येणारे ट्रॅक्टर पकडले. तर दुसऱ्या दिवशी या पथकाने आसना नदी परिसरात गस्त घालत असताना किन्हाेळा भागातील नदीवर वाळू उपसा करून माल वाहतूक करणारा छोटा हत्ती वाहनांची रांगच दिसली. हे पाहून पथकाने पाठलाग करून ८ वाहने जप्त केली. एकजण तावडीतून सुटला. त्याचाही शोध सुरू आहे. माल वाहतुकीची वाहने वाळू वाहतुकीसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने समोर आला आहे. ही वाहने तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेली आहेत. नव्याने रूजू झालेल्या तहसीलदारांनी वाळू उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या टोळ्या हदरल्या आहेत. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार अरविंद बोळंगे, मंडळ अधिकारी किंन्होळकर, कवठेकर, वाईकर, काळे, तलाठी ज्योती स्वामी, सुरेश बोबडे, गरुड, मुंडे, इंगळे यांनी केली आहे.

अनेकांकडून कारवाईचा धसका
तहसीलदारांनी वाळू माफियांविरोधात धरपकड मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वाळू चोरट्यांनी नूतन तहसीलदारांची धसकी घेतली आहे. लिलाव न झालेल्या घाटातून वाळू वाहतुकीसाठी नवीन वाहने खरेदी केल्याचे समोर येत आहे. याचा तपास होणे गरजेचे आहे. पकडलेल्या वाहनधारकांकडून आजपर्यंत कोण हमी देत होते, याची माहिती घेतली तर डायरीचे गुपित बाहेर येऊ शकते. तालुक्यात कारवाई मोहीम राबविली जात असल्याने अनेक वाळूमाफियांनी आपली वाहने अज्ञात ठिकाणी लावली आहेत.  आता वाळू वाहतूक करणे म्हणजे कारवाईला सामोरे जाणे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यामुळे घाटाचे लिलाव कधी होतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Use of freight vehicles for sand theft in Wasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.