हिंगोलीतील बनावट नोटाप्रकरणी यवतमाळमधून दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:51 PM2020-09-05T19:51:31+5:302020-09-05T19:53:52+5:30

हिंगोलीत बनावट नोटा छापून त्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चलनात आणल्याचा संशय

Two arrested from Yavatmal in fake note case in Hingoli | हिंगोलीतील बनावट नोटाप्रकरणी यवतमाळमधून दोघांना अटक

हिंगोलीतील बनावट नोटाप्रकरणी यवतमाळमधून दोघांना अटक

Next
ठळक मुद्देहिंगोली ग्रामीण पोलीस व एटीएसच्या पथकाने उघडकीस आणला कारखाना

हिंगोली : शहरानजीकच्या बळसोंड भागातील आनंदनगरात गुरुवारी पोलिसांनी बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकरणात शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून विनोद कुरुडे आणि इमरान खान या दोघांना अटक केली आहे. या टोळीने बनावट नोटा अनेक जिल्ह्यांत चलनात आणल्याचा संशय आहे.

याप्रकरणी गुरुवारीच संतोष सूर्यवंशी आणि छायाबाई भुक्तार या दोघांना अटक करण्यात आली होती. अरूण हनवते या शिक्षकाच्या घरी भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये संतोष सूर्यवंशी हा बनावट नोटांचा छापखाना चालवायचा. त्यासाठी त्याने कलर प्रिंटर, स्कॅनरही घरात आणले. बाजारपेठेत बनावट व एकाच क्रमांकाच्या नोटा आढळत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी घरावर पाळत ठेवली. 

खात्री पटताच हिंगोली ग्रामीण पोलीस व एटीएसच्या पथकाने गुरुवारी घरावर धाड टाकली. घरातून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पिवळसर धातूच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती व बनावट १७ लाख ४७ हजार ३५० रुपये, प्रिंटर, स्कॅनर, नोटा छापायचे कागद, चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  याप्रकरणी अटक केलेल्या संतोष सूर्यवंशी व छाया भुक्तार या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर पुसदच्या दोघांची नावे त्यांनी उघड केली. त्यावरून पोलिसांनी विनोद कुरूडे व इमरान खान (पुसद) या दोघांनाही अटक करून हिंगोलीत आणले.

तपासासाठी पाच स्वतंत्र पथकांची नियुक्ती
बासंबा, वाशिम, चिखली या पोलीस ठाण्यांमध्ये ४ गुन्हे दाखल असलेल्या संतोष सूर्यवंशी याने हिंगोलीत बनावट नोटा छापून त्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चलनात आणल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सपोनि बर्डे, पोउपनि पांडे आणि भोसले या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. ही पाच स्वतंत्र पथके राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनी दिली आहे.

Web Title: Two arrested from Yavatmal in fake note case in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.