एटीएममशीनमध्ये छेडछाडकरून रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरियाणा राज्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 02:16 PM2021-06-22T14:16:55+5:302021-06-22T14:20:51+5:30
शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून रक्कम पळवली
हिंगोली : एटीएममध्ये छेडछाड करून ४६ हजार ५०० रूपयांची रक्कम लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून घटनेत चौघे चोरटे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिघे चोरटे हरियाणा राज्यातील निघाले. त्यांच्याकडून १० हजार ४०० रूपयांची रक्कम जप्त केली आहे.
शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून त्यातील ४६ हजार ५०० रूपयांची रक्कम लांबविल्याप्रकरणी १९ जून रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी याप्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी त्यांच्या पथकाला कामाला लावले. पोलिसांनी एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तीन ते चार जणांनी एटीएममध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शहरातील लॉजमध्येही शोध घेवून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती एका लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली.
अधिक तपास केला असता जावेद अली (रा. पलवल, हरियाणा) याच्या नावे १७ जून रोजी एक रूम बुक असल्याचे समजले. त्याने लॉजमध्ये दिलेल्या मोबाईलनंबरच्या लोकेशन वरून त्याला अकोला बायपास भागातून ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता गुन्ह्याची कबूली दिली. तसेच यात गारमाळ येथील सलीम प्यारेवाले तसेच अन्य दोघे हरियाणा राज्यातील असल्याचे सांगितले. पोलिसांनी सलीम प्यारेवाले याला जालना येथून अटक केली असून दोघांकडून १० हजार ४०० रूपयांची रक्कम जप्त केली आहे.
हिंगोलीतील चोरीनंतर परभणीतील एटीएममध्ये केली चोरी
हिंगोली शहरातील तीन एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे लांबविल्यानंतर चोरट्यांनी परभणीतील दोन एटीएममधील पैसे लांबविल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच चोरीतील पैसे वाटून घेत वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. मात्र लॉजमध्ये दिलेल्या मोबाईलनंबरमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अलगत सापडले. चोरटे हरियाणा राज्यातील असल्याने अशा गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सायबर सेलने बजावली महत्वाची भूमिका
एटीएममध्ये चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली. मोबाईल लाेकेशन अचूक काढल्याने चोरटा अलगत पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चोरीचा तपास करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, पोह शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, उमेश जाधव, असलम गारवे, पोशि गणेश लेकूळे, दिलीप बांगर, सायबरसेलचे जयप्रकाश झाडे, मुदीराज आदींचा समावेश होता.