रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:35 PM2020-11-28T18:35:19+5:302020-11-28T18:37:17+5:30

हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली.

There is no electricity even at night; MSEDCL's technical failure is rooted in farmers | रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

Next
ठळक मुद्देपिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत

हिंगोली : महावितरणकडून तांत्रिक समस्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस वीज दिली जात नसल्याचा प्रकार घडत आहे. दिवसा आठ तास आणि रात्री दहा तासांची वीज तर कागदावरच असून कारण विचारले तर तांत्रिक बिघाड पुढे करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबीच्या हंगामाची आस  आहे. मात्र वीजच राहात नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली. तरीही ग्रामीण भागात वीज सुरळीत राहात नाही. अनेक कंत्राटदारांवर आरोप झाले. तपासणी झाली. मात्र कारवाई शून्य असल्याने त्याचा फटका आता शेतकरी भोगत आहेत. केवळ भार वाढल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे.

रात्रीचा वीजपुरवठा धोकादायक
शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वेळेनुसार शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्टार्टरमध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी जावे लागते. यामध्ये साप, विंचू  व  वन्य प्राण्यांचा सर्वाधिक धोका शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्याऐवजी सकाळी वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणी
यावर्षी जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडील असलेल्या विहीर, बोअर आदी जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर सध्या शेतकरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा व गव्हासाठी करीत आहेत. एकीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या उदासीनतेने शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू करण्याची गरज आहे.

सध्या गव्हू, हरभरा पिकांना विहिर, बोअरद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे विहिर, बोअरला पुरसेशे पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र सध्या हिंगोली तालुक्यातील सवड परिसरात आहे.   
- सदाशिव थोरात, शेतकरी

दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. मात्र तरीही तांत्रिक अडचण आल्यास तेवढ्या भागापुरताच वीजपुरवठा काही काळ खंडित असतो. त्याशिवाय भारनियमन केले जात नाही 
- नरदेव, महावितरण अधिकारी

Web Title: There is no electricity even at night; MSEDCL's technical failure is rooted in farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.