खळबळजनक ! औंढ्यात डॉक्टरने मृताला केले ‘रेफर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:22 PM2020-08-01T17:22:32+5:302020-08-01T17:26:07+5:30

रुग्ण जिवंत असल्याचे समजून नातेवाईक रुग्णवाहिकेतून हिंगोलीला गेले.

Shocking ! The doctor referred the deceased to Aundha | खळबळजनक ! औंढ्यात डॉक्टरने मृताला केले ‘रेफर’

खळबळजनक ! औंढ्यात डॉक्टरने मृताला केले ‘रेफर’

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोली जिल्ह्यात खळबळग्रामीण रुग्णालयातून पाठविले जिल्ह्याच्या ठिकाणी

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : भोवळ येऊन पडल्याने औंढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे माहिती असूनही हिंगोलीला रेफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील सुतार गल्लीत राहणाऱ्या देवराव ऊर्फ गजानन विधाटे (४५) यांना सकाळी सातच्या सुमारास भोवळ आली व ते कोसळले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे हजर वैद्यकीय अधिकाऱ्यांना हा रुग्ण मरण पावल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्यांनी कुटुंबियांना याची माहिती दिली नाही. उलट सकाळी आठच्या सुमारास हिंगोलीला नेण्यासाठीचे रेफर लेटर दिले. 

रुग्ण जिवंत असल्याचे समजून नातेवाईक रुग्णवाहिकेतून हिंगोलीला गेले. तेथे खाजगी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखविला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेफर लेटर तपासताच हा रुग्ण, तर औंढा नागनाथ येथे मरण पावला असून, त्यावर काय उपचार करणार, असा प्रश्न केला़ त्यामुळे नातेवाईकांच्या संतापात भर पडली. शवविच्छेदन करून मृतदेह अडीचच्या सुमारास नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी  जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे़

प्रकरणाची चौकशी होणार
मृताला असे पाठविणे चुकीचे आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांकडे हे प्रकरण सोपविले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉ़ मंगेश टेहरे यांनी दिली. 

नातेवाईकांचीच मागणी
रुग्ण मयत झाल्याचे सांगूनही नातेवाईक विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे रेफर लेटर दिल्याची माहिती कर्तव्यावरील डॉ. डी. जोगदंड यांनी दिली आहे. मी केलेल्या चौकशीत एवढेच समजले आहे. 
- डॉ. प्रेमानंद निखाडे, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, औंढा

Web Title: Shocking ! The doctor referred the deceased to Aundha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.