वामनदादांच्या सहकाऱ्याच्या पदरी उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:09 AM2021-03-04T06:09:00+5:302021-03-04T06:09:07+5:30

जगण्यासाठी ८५ व्या वर्षीही संघर्ष

Neglect of Vamandada's colleague | वामनदादांच्या सहकाऱ्याच्या पदरी उपेक्षाच

वामनदादांच्या सहकाऱ्याच्या पदरी उपेक्षाच

Next



बालय्या स्वामी
लोकमत न्यूज नेटवर्क 
कौठा (जि. हिंगोली) : ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन करून साऱ्या देशभर भीमगीतांनी समाजप्रबोधन करणाऱ्या शाहीर वामनदादा कर्डक यांना साथसंगत करत जनजागृतीच्या कार्यात सहभागी असणाऱ्या टाकळगाव येथील भीमशाहिराला  आज मात्र हलाखीचे जीवन जगत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उमाकांत कांबळे हे या भीमशाहिराचे नाव. 
वयाच्या ८५ वर्षी उमाकांत कांबळे यांच्यावर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे वास्तव्यास असलेल्या उमाकांत कांबळे यांनी बालपणापासूनच हार्मोनियम, तबला व ढोलकी वाजविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर शाहीर वामनदादा कर्डक यांचा मोठा प्रभाव पडला. वामनदादांच्या प्रत्येक कार्यक्रमास ते आर्वजून उपस्थित असत.  एकदा नाशिक जिल्ह्यात तळवडी येथे खुद्द वामनदादांच्या एका कार्यक्रमात वादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर त्यांनी वामनदादांसोबत भारतभर कार्यक्रम केले. भीमगीतांच्या आवडीमुळे उमाकांत कांबळे या क्षेत्रात रमले. 
‘रण मैदानी लढणारा सुरा होता, बुद्ध आणि भीमगीतांच्या शिवाराचा धुरा होता, वामनदादा म्हणजे शाहिरीचा तुरा होता...’, असे उमाकांत कांबळे अभिमानाने सांगतात. मात्र आता जमाना बदलला. शाहिरीचे कार्यक्रम जवळपास बंद झाले. मोबाइलच्या जमान्यात जुन्या कलावंतांचे अस्तित्वच शून्य झाले, याची खंत कांबळे यांना वाटते. एकेकाळी भीमशाहीर म्हणून असलेला नावलौकीक आता उदरनिर्वाहाच्या कामी येत नसल्याचे शल्य कांबळे यांच्या बोलण्यातून जाणवते. 

उदरनिर्वाहासाठी धार लावण्याचे काम 
nउमाकांत कांबळे यांना दोन मुले असून ते मजुरी, व्यवसाय करतात. पूर्वीपासूनच स्वाभिमानाने जगण्याची धडपड असल्याने आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते मेहनतीवर जीवन जगत आहेत. 
nजवळपास असलेल्या खेडेगावात विळे, कात्री यांना धार लावण्याचे काम ते सायकलवर फिरून करतात. शासनाने आमच्यासारख्या कलाकार मंडळीकडे लक्ष देऊन जगण्याची नवी उमेद देण्याची गरज असल्याचे भीमशाहीर कांबळे सांगतात.

Web Title: Neglect of Vamandada's colleague

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.