बाजारात जास्त भाव असल्याने शेतकरी फिरकेनात अद्यापही नाफेडकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 02:00 PM2019-12-26T14:00:56+5:302019-12-26T14:03:34+5:30

शेतकऱ्यांनी सोयाबीन व उडीदही नाफेडला विकले नाही

Farmers still flock to Nafed | बाजारात जास्त भाव असल्याने शेतकरी फिरकेनात अद्यापही नाफेडकडे

बाजारात जास्त भाव असल्याने शेतकरी फिरकेनात अद्यापही नाफेडकडे

Next
ठळक मुद्देनाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्री

- इलियास शेख 

कळमनुरी : नाफेड खरेदी केंद्राकडे अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकही शेतकरी फिरकला नसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मूग, उडीद व सोयाबीनसाठी ७०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. २०० ते २५० शेतकऱ्यांनी मुग विक्रीसाठी नाफेडकडे आणले. परंतु सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे आणले नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नाफेडमार्फत मुगाला ७ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल, उडीद ५ हजार ७०० रुपये, सोयाबीनला ३ हजार ७१० प्रतिक्वंटल हमीभाव आहे. आॅनलाईन नोंदणी करूनही शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे फिरकले नाहीत.

यावर्षीही नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. येथील बाजार समितीत कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत मूग, उडीदाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. तर डिसेंबर अखेरपर्यंत सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीची मुदत असल्याचे सांगण्यात आले. बाजारात भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरविली. माल विक्रीनंतरही रक्कम आॅनलाईन जमा होण्यासाठी विलंब लागत असल्याने आता शेतकरी अन्य बाजारात शेतमाल विकून पैसा मोकळा करत आहेत.

नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. सातबारावर चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारकआहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारक आहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा पेरा मांडलेलाच नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नाफेडकडे शेतमाल विक्री करूनही चुकारे मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. तसेच आॅनलाईन नोंदणीही यावर्षी कमी प्रमाणात झाली आहे. यावर्षी पावसाळ्यात सुरूवातीला एकमहिना पाऊस पडला नाही. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा घटलेला आहे. यामुळे आॅनलाईन नोंदणीही कमी प्रमाणात झाली. परतीच्या पावसामुळे तर सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. हातातोंडाशी आलेले सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा उताराही कमालीचा घटला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील १४ ते १५ वर्षांपासून  कापूस खरेदी बंद आहे. 

जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्री
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचा पेरा आहे. जिनींग प्रेसींग नसल्यामुळे येथे कापूस खरेदी होत नाही. तसेच या कापसावर तालुक्यात कोणतीही प्रक्रिया करण्याची सुविधा नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस विक्रीसाठी दरवर्षी परप्रांतात नेला जातो. यावर्षी परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांना म्हणावे तसे उत्पन्न झालेच नाही. यावर्षी कापसाचा उताराही घटला आहे. जिनींग प्रेसींगसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. जिनींग प्रेसींग झाल्यास कापूस परप्रांतात विक्रीसाठी जाणार नाही.

Web Title: Farmers still flock to Nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.