बेफाम वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:18 PM2020-12-02T19:18:35+5:302020-12-02T19:25:08+5:30

नदीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या शेतकऱ्यांनाही या वाळू उपशाचा फटका सोसावा लागत आहे.

The existence of the river is threatened due to uncontrolled sand subsidence | बेफाम वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

बेफाम वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

Next
ठळक मुद्देबंदी असताना हिंगोली जिल्ह्यात राजरोस वाळू उपसा सुरूशेकडो ब्रासची रोजच वाहतूक

हिंगोली: कधी वैध तर कधी अवैध वाळू उपसा केल्याने जिल्ह्यातील नदीपात्रांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात कयाधू, पूर्णा नदीपात्राला यामुळे जास्त धोका होत असून पैनगंगा नदीवर बॅरेजेस झाल्यापासून वाळू उपशाचे प्रमाण घटले आहे.

हिंगोली जिल्ह्यातून कयाधू, पूर्णा या दोन नद्या वाहतात. तर मराठवाडा व विदर्भाची सीमा असलेल्या पैनगंगेचाही काही प्रमाणात लाभ होतो. या नद्यांमधून कधी वाळूघाट लिलावात गेल्याने तर कधी अवैधपणे वाळूउपसा केला जातो. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकांना वाळू पुरवठा करण्यासाठी याच तीन नद्यांवर मोठी भिस्त आहे. वाळूमाफिया वाळूउपसा करताना पात्राचा किंवा त्यामुळे प्रवाहावर काय परिणाम होईल, याचा फारसा विचार करीत नाहीत. 

परिणामी अनेक ठिकाणी नदीचे पात्र कुठे खोल तर कुठे एका बाजूनेच कोरल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीने मूळ प्रवाहच बदलल्याने शेतीचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी एकाच बाजूने झालेल्या खोदकामाचा फायदा घेत काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या बाजूला गाळ साचण्याची व्यवस्था केल्याचे प्रकारही घडतात. तर अवैधपणे निर्माण केलेले रस्तेही पात्र ओसंडून वाहण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात येत असून काही ठिकाणी वाळूच शिल्लक न राहिल्याने जास्त काळ पाणी मुरून राहत नसल्याचेही दिसते.

पात्र रुंदावल्याने शेतकऱ्यांना फटका
नदीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या शेतकऱ्यांनाही या वाळू उपशाचा फटका सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी पात्राच्या काठाकडून वाळू उपसा केला जातो. परिणामी, पाण्याच्या प्रवाहाने हे काठ ढासळून गाळ वाहून जातो. यामुळे पात्र रुंदावत चालले आहे. तर काही ठिकाणी रस्ते बनविण्यासाठी असे खोदकाम केल्याने शेतात पाणी घुसत असल्याचीही ओरड शेतकऱ्यांकडून केली जाते. मात्र, याबाबत दाद मागायची तर अवघड परिस्थिती असते. त्यामुळे अनेक जण निमूटपणे हे सहन करतात. 

शेकडो ब्रासची रोजच वाहतूक
पूर्णा व कयाधू नदीचे घाट सध्या लिलावात गेले नाहीत. मात्र, या दोन्ही नद्यांमधून प्रत्येकी किमान रोज दहा ते पंधरा ट्रॅक्टर तसेच तेवढीच मोठी वाहने वाळू चोरून नेतात. जर घाट लिलावात गेले तर रोज शेकडो वाहने धावतात. त्यामुळे हजारो ब्रास वाळू रोज काढली जाते.

नदीपात्रातून वारंवार वाळू काढली जाते. खरेतर त्याला काही वर्षे विश्राम देऊन पुन्हा उपसा केला पाहिजे. त्यामुळे समतोल राखला जातो. मात्र, बऱ्याच ठिकाणी नदीचे पात्र खरडून नेण्याचा प्रकार घडला आहे. नदीचे पात्र वाहते झाले तर वाळू येते. मात्र ज्यावर्षी जास्त पूर गेले नाहीत, त्याहीवर्षी हा उपसा सुरूच असतो. त्याचा परिणाम भूगर्भ जलस्तरावर होतो. वाळू उपसा थांबला पाहिजे. निसर्ग नियम पाळले पाहिजे. दगडाची चुरी हा वाळूवर पर्याय आला. त्याचा वापर केल्यास नदीची हानी टळेल. खदानीत पाणीही साचेल.
- जयाजी पाईकराव, पर्यावरणतज्ज्ञ
 

Web Title: The existence of the river is threatened due to uncontrolled sand subsidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.