'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:02 IST2025-12-02T13:57:38+5:302025-12-02T14:02:25+5:30
गोपनीयतेचा भंग केल्याचा आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप

'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला
हिंगोली : हिंगोली नगरपालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर घोषणाबाजी केल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली आहे.
हिंगोली नगरपालिकेसाठी शहरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या प्रक्रियेदरम्यान आमदार संतोष बांगर हे मंगळवारी सकाळी मतदान करण्यासाठी केंद्रावर गेले. मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी घोषणाबाजी केली. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले. मतदान केंद्रामध्ये मतदानानंतर घोषणाबाजी करताना त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. हा गोपनीयतेचा आणि आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार : आ.तान्हाजी मुटकुळे
आमदार संतोष बांगर यांच्याविषयी मागच्या आठवड्यापासून आम्ही आरोप करीत आहोत. आज ते त्यांनी सिद्ध करुन दाखविले. मतदान केंद्रावर जाऊन घोषणाबाजी करणे, मतदान केंद्रात एका महिलेच्या हाताला धरुन तिला मतदान कुठे करायचे ते सांगणे, हा प्रकार आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. त्याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे, असे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.
अहवाल मागवून कारवाई
आमदार संतोष बांगर यांच्याबाबत समाज माध्यमावर व्हिडिओ फिरत आहे. त्यात प्रथमदर्शनी केंद्रामध्ये अनधिकृतरित्या मोबाईल वापरणे व हातवारे केल्याचे दिसत आहे. या अनुषंगाने गोपनीयतेचा भंग झाल्याबाबतचा अहवाल मतदान केंद्राध्यक्षाकडून मागवून पुढील कारवाई केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटूकडे यांनी सांगितले.