कान म्हणजे, आपल्या शरीराचा संवेदनशील भाग असतो. हे माहित असूनही अनेक लोक याच्याशी निगडीत समस्यांकडे दुर्लक्षं करतात. शरीराच्या इतर अवयवांच्या स्वच्छतेप्रमाणेच कान स्वच्छ ठेवणं तितकचं आवश्यक ठरतं. परंतु आपल्यापैकी काही लोक कान स्वच्छ करताना काही गोष्टी लक्षात घेतच नाहीत. परिणामी यांमुळे कानाशी निगडीत वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडून होणाऱ्या अशा काही चुकांबाबत सांगणार आहोत, ज्या पुन्हा पुन्हा केल्यामुळे तुम्हाला बहिरेपण येऊ शकतं. 

(Image Credit : DHgate.com)

कान स्वच्छ करण्यासाठी वॅक्सचा वापर करणं 

कानामध्ये खाज येणं किंवा मळ म्हणजेच ईअर वॅक्स जमा होत असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला वॅक्सचा वापर करतात. या प्रक्रियेला ईअर कॅन्डलिंग म्हटलं जातं. ही पद्धत घातक असण्यासोबतच यामुळे कानाच्या आतील संवेदनशील भागाला भाजूही शकतं. याव्यतिरिक्त ईअर वॅक्स जेव्हा पूर्णपणे निघून जातं, त्यावेळी कान ड्राय होतो. ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे कान स्वच्छ करण्यासाठी कॅडलिंग करणं टाळा.

ईअरफोन्सचा मोठा आवाज

कानामध्ये ईअरफोन्स टाकून मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचा जणू काही ट्रेन्डच आला आहे. अनेक संशोधनांमधूनही सिद्ध झालं आहे की, बहिरेपणासाठी सर्वाधिक परिणामकारक ठरणाऱ्या कारणांमध्ये ईअरफोन्सचाही समावेश होतो. जर तुम्हीही अशाचप्रकारे गाणी ऐकत असाल तर असं करणं बंद करा. 

(Image credit :thestatesman.com)

कानामध्ये वेदना होत असतील तर स्वतःच उपचार करणं 

कानाशी निगडीत छोट्या समस्या असल्या तरिही त्यावर उपचार स्वतः करू नका. कानाच्या आतील पडदा अत्यंत नाजुक असतो. त्यामुळे असे उपचार कानासाठी घातक ठरतात. जास्त दिवस कानामध्ये वेदना होत असतील आणि त्यावर उपचार केले नाही तर त्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कानामध्ये वेदना केवळ कानाच्या समस्यांमुळे होत नाहीत. तर हिरड्या, तोंड, घसा यांमध्येही काही समस्या असतील तर कानांमध्ये वेदना होतात. 

(Image Credit : Noisy Planet)

कान स्वच्छ करण्यासाठी इतर गोष्टींचा वापर करणं 

कान स्वच्छ करण्यासाठी काहीही विचार न करता आपण काहीही कानात टाकतो. अनेकदा बर्ड्स किंवा अगरबत्तीची काडी कानामध्ये टाकतो. कानाच्या आतमध्ये असणारा पडदा अत्यंत नाजुक असतो. तसेच काहीही कानामध्ये टाकल्याने कानाला इन्फेक्शन होऊ शकतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: These mistakes you need to stop making with your ears
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.