साधारणतः उपवासाच्या दिवशी आपण राजगिऱ्याच्या पदार्थांचा समावेश करतो. राजगिऱ्याचे लाडू, चिक्की असे पदार्थ उपवासाच्या दिवशी आपल्या पोटासाठी वरदान ठरतात. पण राजगिऱ्याचा फक्त उपवासाच्या दिवशीच नाहीतर दररोजही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. राजगिऱ्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला राजगिऱ्याच्या शरीराला होणाऱ्या विविध फायद्यांबाबत सांगणार आहोत. राजगिऱ्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. राजगिऱ्याला रामदाना,अमरनाथ म्हणूनही ओळखतात. जाणून घेऊया राजगिऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत... 

राजगिऱ्यातील गुणधर्म 

शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे, कॅल्शिअम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त राजगिऱ्यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम यांसारखी आवश्यक तत्वही असतात. राजगिऱ्याच्या लाह्या पचण्यास अत्यंत हलक्या आणि शरीरासाठी पौष्टिक असतात. राजगिऱ्यापासून धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा असे पदार्थही तयार करण्यात येतात. 

राजगिऱ्याचे फायदे : 

1. हाडांसाठी फायदेशीर 

राजगिऱ्यामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत तीन पटिंनी अधिक कॅल्शिअम असतं. त्यामुळे याचा डाएटमध्ये समावेश केल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. तसेच ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या समस्या बळावण्याचा धोका कमी होतो. 

 2. केसांच्या मजबुतीसाठी 

नियमितपणे राजगिऱ्याचा आहारात सामवेश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात. यामध्ये मुबलक प्रमाणात लायसिन असतं, जे केस दाट आणि मजबुत करण्यासाठी मदत करतं. तसेच यामध्ये सिस्टीनही असतं, जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं. 

3. पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत 

कॅल्शिअम व्यतिरिक्त आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि फॉलिक अ‍ॅसिड यांसारखी पोषक तत्त्व राजगिऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये विघटनशील फायबर, प्रोटीन आणि जिंक मुबलक प्रमाणात असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यामध्ये कमी फॅट असतात. 

4. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करतो मदत 

राजगिऱ्याच्या बियांमध्ये फायटोस्टरोल असतं, जे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतं. तसेच हे शरीरामधील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतं आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतं. 

5. इन्फ्लामेशन कमी करतो

राजगिऱ्यामध्ये पेप्टाइड्स असतं, ज्यामुळे हे इन्फ्लामेशन आणि वेदना कमी करतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सही असतात. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. 

असा करा राजगिऱ्याचा वापर...

राजगिऱ्याचा वापर तुम्ही पुडिंग, काकडी आणि दलियामध्येही करू शकता. तुम्ही या बिया पॉप करून स्नॅकच्या स्वरूपात खाऊ शकता. राजगिऱ्याच्या पिठामध्ये मल्टीग्रन पिठासोबत एकत्र करून डाएटमध्ये समावेश करू शकता. तसेच हे तुम्ही सलाडच्या स्वरूपातही खाऊ शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

 

English summary :
Want to know about benefits of amaranth seeds or rajgira? click here. Also check for other healthy Diet related tips at lokmat.com.


Web Title: Surprising health benefits of amaranth seeds or rajgira
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.