Health 'असं' वजन कमी करायला जाल, तर 'भारी'च पडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 03:04 PM2018-04-19T15:04:36+5:302018-04-19T15:04:36+5:30

वजन जितकं पटकन कमी होतं, तितकं पटकन वर येतं. यालाच "यो-यो इफेक्ट" म्हणतात.

how to manage diet plan to reduce weight | Health 'असं' वजन कमी करायला जाल, तर 'भारी'च पडणार!

Health 'असं' वजन कमी करायला जाल, तर 'भारी'च पडणार!

googlenewsNext

>> डॉ. नेहा पाटणकर

पल्लवीने २ फेब्रुवारीला कॅलेंडरवरील तारखा अपडेट करणं चालू केलं. काही डेडलाईन्स आणि टार्गेट्स होती. त्यातलं अगदी महत्त्वाचं टार्गेट म्हणजे एप्रिलमध्ये असलेलं तिच्या बहिणीच्या दिराचं लग्न. हल्लीच्या प्रथेप्रमाणे गोव्याला "डेस्टिनशन वेडिंग " ठेवलं होतं. प्री-वेडिंग फोटो शूटसुद्धा ठेवलं होतं. साखरपुडा मागच्या महिन्यात झाला तेव्हाच्या फोटोमध्ये पल्लवी चांगलीच जाड दिसत होती.

पल्लवीने ३१ मार्च ही डेडलाईन ठरवली आणि दहा किलो वजन कमी करण्याचं टार्गेट ठेवलं. दोन महिने हातात होते. अगदी दहा किलो नाही तरी सात-आठ किलो तरी कमी करायचंच, असा निर्धार तिने केला. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी तिने व्यवस्थित प्लॅनिंग चालू केलं. रिसेप्शनसाठी वन पिस गाऊन आणि लग्नाच्या वेळेला नऊवारी साडी, ट्रॅडिशनल ज्वेलरीचा प्लॅन पक्का झाला होता. आता फक्त आणि फक्त एकच ध्येय होतं. वजन कमी करायचा चंगच तिनं बांधला होता. काउंटडाऊन चालू झाला होता.

तिने गुगल महाराजांना वंदन करून सर्च टाकला. बाप रे, २०० प्रकारची डाएटस तिच्या नजरेपुढे अवतरली. मेडिटरेनीयन, अॅटकिन्स, ग्लूटेन फ्री, जनरल मोटर्स अशी भारी भारी नावांची डाएट्स तिला सापडली. त्यातली झुकीनी, हुंमुस, ताहिनी सॉस अशी नावं वाचून ती जरा दचकलीच. याचा अर्थ आता उद्या बघते म्हणून त्यातल्या त्यात एक करायला सोपं अशा डाएटचा तिने श्रीगणेशा केला. ७००० कॅलरीज डाएट आणि व्यायामामधून कमी झाल्या म्हणजे एक किलो वजन कमी होते असा हिशोब मनात धरला.

आठ दिवस छान डाएट पार पडलं. सध्या वजनाचा काटा तिचा नवा आणि अगदी जवळचा मित्र झाला होता. भूक खूप लागायची पण थोडा ग्रीन टी प्यायला की फ्रेश वाटायचं. आठवड्याभरानंतर ५०० ग्रॅम वजन कमी झाल्याचं तिच्या जिवलग मित्राने (वजनाचा काटा) सांगितलं. पल्लवी एकदम खूष झाली. तिला हलकंही वाटायला लागलं होतं. आणखी जोमाने दोन वेळा वॉक आणि डाएट चालू ठेवलं.

तेवढ्यात एक डोहाळजेवण मध्ये आलं आणि आपले आवडते पदार्थ बघून जरा जास्तच जेवली पल्लवी. मग त्याची भरपाई म्हणून तीन वेळा वॉक आणि फक्त सूप-सॅलेड्स खाल्ली. आणखी एक किलो वजन कमी झालं. मग कीटी पार्टीमध्ये मैत्रिणींच्या आग्रहाला बळी पडून चीझ बर्गर आणि पिझ्झा खाल्ला गेला. अगं, एक दिवस चालतंय की, असं सगळ्या म्हणाल्या म्हणून हिनं जंक फूड खाल्लं. पण, नंतर इतकं गिल्टी वाटलं की आल्यावर उलटी करून ते काढून टाकलं.

एका महिन्याच्या अखेरीस २ किलो ७०० ग्रॅम एवढंच वजन उतरलं होतं. आता काय करायचं? मग तिनं जालीम उपाय म्हणून 'जनरल मोटर्स डाएट' हा फक्त भाज्या, सूप्स आणि फळं असा डाएट चालू केला. 

हल्ली खूप गळल्यासारख वाटायचं ,डोळ्याखाली काळं दिसायला लागलं. तुम्हाला बरं नाही का? असं सगळे विचारायला लागले. पण काय करणार? "टार्गेट" डोळ्यासमोर ठेवून मेहनत चालू होती. आणखी पाच किलो तरी कमी व्हायलाच पाहिजे बाबा!

३१ मार्चला १५ दिवस शिल्लक होते. फक्त ग्रीन टी, व्हेज सूप्स आणि व्हेज स्मूदि चालू होतं. लग्नाची बाकीची तयारी झाली होती. पार्लरमध्ये जाणं आणि बारीकसारीक खरेदी बाकी होती. त्या दिवशी सकाळपासूनच डोकं दुखायला लागलं होतं. पण भाज्या संपल्या म्हणून पल्लवी संध्याकाळी बाहेर पडली. अचानक अशक्तपणा येऊन डोळ्यापुढे थोडी अंधारी आली आणि एका खड्ड्यात पाय अडकून पल्लवी पडली. पाय सुजला होता. एक्स रे काढला तर Fracture!!!पल्लवीला रडूच फुटलं. दीड महिना प्लास्टर सांगितलं होतं.

वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या एवढ्या मेहनतीचा काय फायदा झाला?, असं म्हणत ती हताशपणे बसून राहिली.

पल्लवीसारखे अनेक जण असं करायला जातात. वजन कमी करणे हे गणितासारखे नसते. इतकं केलं की इतकं जाईल असं मोजमाप कुठेच नसतं. त्यातून इतक्या दिवसात इतकं वजन कमी व्हायलाच पाहिजे असं टार्गेट आणि डेडलाईन ठेवली तर त्याचे आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर नको ते परिणाम होतात. त्या वजन कमी करण्याचा एक स्ट्रेस निर्माण होतो. काहीही करून टार्गेट अचिव्ह करण्याच्या हट्टामुळे केस गळणे, चेहऱ्याची आणि शरीराची त्वचा ओघळणे, फिकट दिसणे इत्यादी गोष्टी दिसून येतात. कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ होतात आणि थोड्याशा दुखापतीनेसुद्धा फ्रॅक्चर होऊ शकते.

वजन जितकं पटकन कमी होतं, तितकं पटकन वर येतं. यालाच "यो-यो इफेक्ट" म्हणतात. कमी केलेलं वजन तसंच टिकवून ठेवणं कठीण असतं. डाएट चालू करण्याआधी काही deficiencies नाहीत हे बघितलं पाहिजे. घरातल्या माणसांना आणि मित्र-मैत्रिणींची सपोर्ट सिस्टीम तयार करून झेपतील अशी टार्गेट्स ठेवायला हवी. म्हणजेच 'डेस्टिनशन'पेक्षा तिथपर्यंत प्रवास जास्त महत्त्वाचा! वजन कमी होत जाण्याची प्रक्रिया एन्जॉय करणं, त्याचा स्ट्रेस न घेता आनंद घेणं महत्त्वाचं!
 

Web Title: how to manage diet plan to reduce weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.