रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:33 PM2019-06-23T16:33:02+5:302019-06-23T16:35:04+5:30

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरुवात होत असते.

Healthy Food for womens in menopause | रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

रजोनिवृत्तीचा काळ आणि आहारात बदल!

googlenewsNext

(Image Credit : health.harvard.edu)

-प्रिया गुरव

रजोनिवृत्ती हा काळ स्त्री जीवनात सगळ्यात मोठा बदल घडवणारा असतो. संप्रेरकांच्या असंतुलनामुळे शरीरात बदल होत राहतात, संप्रेरके जसे की इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन याचे स्रावाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराची सुरु वात होत असते. या कालवधीतील आहार हा पौष्टिक असला पाहिजे, त्यासाठी आहारात बदल केले, तर रजोनिवृत्ती टाळू शकत नाही. पण त्यामुळे होणारे दीर्घकालीन आजार रोखू शकतो. तसेच रजोनिवृत्तीच्या कालखंडात होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासाची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.

इस्ट्रोजन व प्रोजेस्टोरन या संप्रेरकाचे स्रावाचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. ज्यामुळे वजन वाढ होते. इस्ट्रोजनचा कमी प्रमाणातील स्त्राव हाडांची घनता कमी होणे, हाडांची बळकटी कमी होणे याला कारणीभूत ठरतात. तसेच या दोन संप्रेरकांच्या कमतरतेमुळे स्त्रीला भावभावनांमध्ये चढ उतार जाणवणे, शरीरात गरम पट्टे जाणवणे असे बदल होऊ शकतात. या बदलाची तीव्रता आहार व व्यायाम, प्राणायाम यातून आपण कमी करू शकतो. आहारामध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने, ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड, फायटोइस्ट्रोजन, कॅल्शियम आणि लोहयुक्त आहार याचा समावेश केला तर रजोनिवृत्तीचे लक्षण व त्रास याची तीव्रता कमी होते.

फायटोइस्ट्रोजन : फायटोइस्ट्रोजन हे वनस्पतीजन्य पोषणमूल्य आहे, जे आपल्याला सोयाबीन व सोयाबीनची विविध उत्पादने जसे की, सोया मिल्क, टोफू(सोया पनीर), सोया भाजी, कडधान्य, गडद हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, संत्री यातून मिळू शकते. फायटोइस्ट्रोजन हे शरीरातील असंतुलित संप्रेरकांच इस्ट्रोजन आहे. याचे नियमीत स्त्राव करून रजोनिवृत्तीच्या बदलांना कमी त्रासदायक करतो. यादरम्यान पोषणमूल्य शरीरास नियमितपणे आहारातून उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून नैसर्गिकपणे वजन नियंत्रण, भावभावनांचे उतारचढाव यात मदत करतात.

उत्तम दर्जाचे प्रथिने : दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही, ताक, चीज, लोणी हे फॉफ्सरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन डी ही जीवनसत्त्वे शरीरास उपलब्ध होऊन त्यामुळे हाडांची घनता टिकवणे, शांतपणे झोप लागणे यासाठी फायदा होतो.

ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिड : विविध प्रकारच्या बिया जसे की, आळशी, चिया आणि मगज किंवा भोपळ्याच्या बिया, अक्रोड सोयाबीन तेल, विविध तेल ,कॉड लिव्हर तेल, कडधान्यं हे ओमेगा ३फॅटी अ‍ॅसिडचे उत्तम स्त्रोत असून याचा आहारात नियमितपणे वापर केल्यास त्रास होत नाही. तसेच रजोनिवृत्तीचे अनुषंगिक विकार पुन्हा उद्भवत नाहीत.

तसेच या काळात कुठल्याही प्रकारचे पोषणमूल्याचा अभाव असलेले पदार्थ आहारात घेऊ नयेत. जसे की तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, अतिप्रकिया केलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शीतपेय आहारात टाळावेत. त्याऐवजी धान्ययुक्त आहार, भाकरी, पोळी, कमी पॉलिशचा तांदूळ, वेगवेगळ्या डाळी, मोड आलेली कडधान्ये, विविध रंगाच्या पालेभाज्या, फळभाज्या, पिवळ्या केशरी रंगाची फळ याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मधुमेह, कर्करोग, अनियंत्रित वजन वाढ असे आजार टाळले जाऊ शकतात. तसेच या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी योगासन,व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा मदत करू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो किंवा वेळीच उपचार घेता येऊ शकतात.

Web Title: Healthy Food for womens in menopause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.