Health: 'शेपू' सेहत के लिए तू तो लाभदायक है...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 01:06 PM2018-04-02T13:06:40+5:302018-04-02T13:06:40+5:30

ग्रीक लोकांत शेपू दारी असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानले जाते. शेपूच्या बियांना ‘मिटींगहाउस सीड्स’ असे नाव होते.

Health Benefits of Dill or Shepu vegetable | Health: 'शेपू' सेहत के लिए तू तो लाभदायक है...

Health: 'शेपू' सेहत के लिए तू तो लाभदायक है...

googlenewsNext

- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)

मधुमेह झाला की डॉक्टरकडे जाण्याआधी खाण्यातून साखर आणि बटाटा हद्दपार होतात. एकूणच खाण्यावर बंधने घालून घेतली जातात. सकाळचा ‘मॉर्निंग वॉक’ चालू होतो. योग चालू होतो. मनांत आशा असते, आता एवढे सगळे केल्यामुळे मधुमेह नाहीसा झाला असणार. पण साखर थोडीशीच कमी होते. मग डॉक्टरकडे जाणे होते. बहुतेक जण डॉक्टरला सांगतात, “डाएट कितीही कडक द्या, आयुष्यभर करीन; पण तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या नकोत.” डाएट लिहायला बसले की सांगतात, “बाकी काहीही चालेल पण शेपू नको”. हे मी इतक्यांदा ऐकले आहे की मला शेपूची दया येते. आयुष्यात कधी शेपू न खाल्लेल्या माणसाला शेपूचा इतका तिटकारा का असावा हे एक कोडेच आहे. कदाचित त्या नावातच काहीतरी असावे. शेक्सपिअर ‘रोमिओ आणि ज्यूलिएट’ मधे म्हणतो,  “What's in a name? that which we call a rose, By any other name would smell as sweet.” आज तो माझ्या क्लिनिकमधे आला असतां तर त्याला समजलं असतं, ‘नावात काय जादू आहे ते’. 

डाएट लिहून देताना जर सांगितले की काही दिवस तुला ‘डिल’ नावाची भाजी खायला लागेल तर त्याला ते ‘दिल’ असे वाटते आणि तो तयार होतो. नेटवरून तो डिल च्या रेसिपी शोधतो आणि आवडीने खातो. जेव्हा त्याला कळते डिल म्हणजेच शेपू तेव्हा त्यालाच गंमत वाटते. 

डिल हे नाव जुन्या नॉर्मन भाषेतील ‘डिला’ या शब्दावरून पडले आहे. त्याचा अर्थ जोजवणे किंवा शांत करणे. ग्रीक लोकांत शेपू दारी असणे हे ऐश्वर्याचे लक्षण मानले जाते. हल्ली डॉक्टरना, ‘तुम्ही शपथ घेतली होती ना’ असे म्हणून सल्ले दिले जातात. त्या शपथेचा जनक असलेल्या हिपोक्रेटिसचे एक औषध मजेशीर होते. तोंड धुवायला किंवा तोंड आले तर तो शेपूच्या बिया वाईनमधे उकळवून त्या वाईनने चूळ भरायला, गुळण्या करायला सांगत असे. जर्मनीमध्ये शेपूची पाने वधुवस्त्रांवर लावून ठेवीत. असे केल्याने संसार सुखी होतो असा समज होता. शेपूच्या बियांना ‘मिटींगहाउस सीड्स’ असे नाव होते. चर्चमध्ये प्रवचन चालू असताना लोक जागे रहावेत म्हणून या बिया चघळायला देत असत. आपल्याकडे सुपारीचे खांड चघळीत तसाच प्रकार.  ‘चार्ल्स द ग्रेट’ मेजवानीच्या वेळेस शेपूच्या काढ्याच्या कुप्या टेबलावर ठेवीत असे. कुणालाही उचकी लागली की हा काढा पीत असत. 

शेपूच्या नियमित सेवनाने मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयरोग या रोगांवर नियंत्रण मिळवायला मदत होते. इतरही अनेक उपयोग आहेत शेपूचे. ‘पु.ल.’ म्हणतात ना की, ‘दगडी शिदोबा बेडकीहळ्ळी’ अशा नावाची मुलगी सुंदर असू शकते, तसेच शेपूचे आहे. गुण आहेतच पण सुगरणीचा ( सुगरण्याचा ) हात लागला तर चवीचे ‘वाण’ लागते आणि शेपू ची गोष्ट ही ‘दिल की बाते’ होऊन जाते.

Web Title: Health Benefits of Dill or Shepu vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.