मास्क घातल्यावर श्वास गुदमरतो, दम लागतो? आता चिंता सोडा, लवकरच येणार ‘स्मार्ट फेस मास्क’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:17 AM2021-10-20T05:17:16+5:302021-10-20T05:19:06+5:30

व्यायाम करताना, कष्टाची कामे करताना, धावपळीच्या वेळी या मास्कमुळे अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे होणे असे प्रकार होतात. मात्र, आता संशोधकांनी या उणिवांवर मात करणारा ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात यश मिळविले आहे.

coronavirus news Smart Face Mask coming soon | मास्क घातल्यावर श्वास गुदमरतो, दम लागतो? आता चिंता सोडा, लवकरच येणार ‘स्मार्ट फेस मास्क’

मास्क घातल्यावर श्वास गुदमरतो, दम लागतो? आता चिंता सोडा, लवकरच येणार ‘स्मार्ट फेस मास्क’

Next

- प्रसाद ताम्हनकर (prasad.tamhankar@gmail.com)

‘अन्न, वस्त्र, निवारा’ या जोडीला आता ‘फेस मास्क’देखील अनिवार्य होऊ लागला आहे. सध्या ‘जीवनावश्यक’ या गटात मोडणारा हा मास्क वापरणे प्रत्येक वेळी आरामदायी असतेच असे नाही. व्यायाम करताना, कष्टाची कामे करताना, धावपळीच्या वेळी या मास्कमुळे अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे होणे असे प्रकार होतात. मात्र, आता संशोधकांनी या उणिवांवर मात करणारा ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात यश मिळविले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड या फेस मास्कला देऊन त्याला एक ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात आले आहे. हा फेस मास्क वापरकर्त्याच्या श्वास घेण्याच्या पद्धतीनुसार आणि आजूबाजूच्या प्रदूषित वातावरणाला अनुसरून स्वत:मध्ये योग्य ते बदल करू शकणार आहे.
उदा. तुम्ही स्वच्छ वातावरणात, एकट्याने व्यायाम करीत असाल, तर अशावेळी तुम्हाला अत्यंत बारीक छिद्र असलेल्या मास्कची गरज नाही. अशावेळी संबंधित वातावरणाचा अंदाज घेऊन, हा मास्क आपल्या छिद्रांचा आकार थोडा मोठा करील, ज्यामुळे अधिक हवा या मास्कमधून आत शिरू शकेल आणि मास्क वापरणाऱ्याला श्वास घेणे अधिक सुलभ होईल. याउलट तुम्ही गर्दीच्या ठिकाणी अथवा एखाद्या प्रदूषित ठिकाणी असाल, तर त्याचा अभ्यास करून, हा मास्क त्याप्रमाणे आपल्या छिद्राच्या आकारात योग्य तो बदल करील. नॅनो फायबरपासून बनविण्यात आलेल्या या मास्कमध्ये, अत्यंत बारीक छिद्राचा एक डायनॅमिक एअर फिल्टर बसविण्यात आला आहे. या फिल्टरच्या चारी बाजूला ताण पडण्यासाठी खास ‘स्ट्रेचर’ लावण्यात आले आहे. हे स्ट्रेचर एका पोर्टेबल डिव्हाइसला कनेक्ट करण्यात आले असून, या डिव्हाइसमध्ये एक एअर पंप, सेन्सर आणि मायक्रोकंट्रोलर चीप बसविण्यात आली आहे. या फिल्टरवर ‘स्ट्रेचर’चा जोर पडल्यानंतर याची छिद्रे थोडी मोठी होतात, ज्यामुळे जास्तीची हवा सुलभपणे आत शिरते. ही छिद्रे मोठी झाली, तरी या फिल्टरच्या क्षमतेत फक्त ६ टक्के फरक पडतो. हा स्मार्ट फिल्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकाशी जोडता येऊ शकतो. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा हवेतील प्रदूषित कण व इतर पदार्थांचा अभ्यास करते आणि मास्कला योग्य त्या सूचना पोहोचविल्या जातात.

Web Title: coronavirus news Smart Face Mask coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.