सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 11:08 IST2025-12-07T11:08:06+5:302025-12-07T11:08:48+5:30
जगभरात'ओझेम्पिक' आणि 'वेगोवी' सारख्या अँटी-ओबेसिटीलऔषधांच्या इंजेक्शन्सचा वापर वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, ही अशा प्रकारची औषधे घेणे थांबवल्यानंतर काय होते, यावर नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.

सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
गलेलठ्ठ लोकांसाठी वेटलॉसचे इंजेक्शन भारतात लाँच झाले आणि अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेकांना स्लीम होण्याची स्वप्ने पडू लागली, कोणतेही कष्ट न घेता लवकर मिळणारे यश हे टिकविण्यास तेवढेच कठीण असते, याचा या लोकांना विसर पडला. परंतू, हे इंजेक्शन किती काळ घेणार, हजारो रुपये किती महिने खर्च करत बसणार, याचा विचार करणारे एक संशोधन समोर आले आहे.
जगभरात'ओझेम्पिक' आणि 'वेगोवी' सारख्या अँटी-ओबेसिटीलऔषधांच्या इंजेक्शन्सचा वापर वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, ही अशा प्रकारची औषधे घेणे थांबवल्यानंतर काय होते, यावर नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधनानुसार, वजन कमी करणारी ही औषधे थांबवल्यानंतर अवघ्या आठ आठवड्यांमध्ये लोकांचे वजन पुन्हा वाढण्यास सुरुवात होत असल्याचे समोर आले आहे.
चीनमधील 'पीकिंग युनिव्हर्सिटी पीपल्स हॉस्पिटल'च्या संशोधकांनी सेमाग्लूटाइड आणि लिराग्लूटाइड यांसारख्या औषधे घेणाऱ्या १५७३ लोकांवर हे क्लिनिकल ट्रायल करण्यात आले. यामध्ये हे औषध देणे थांबविल्यानंतर सुमारे ८ आठवड्यांच्या आतच रुग्णांचे वजन पुन्हा वाढायला सुरुवात झाल्याचे दिसले.
८ आठवड्यांनंतर: सुमारे १.५ किलोग्रॅम वजन वाढले.
२० आठवड्यांनंतर: एकूण सुमारे २.५ किलोग्रॅम वजन वाढले.
सुमारे ६ महिन्यांनी (२६ आठवड्यांनंतर) वजन एका स्थिर पातळीवर आले होते.
डॉक्टर म्हणतात नैसर्गिक पद्धतच योग्य...
वजन कमी करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स आणि औषधे घेण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काही सोपे आणि नैसर्गिक बदल करून कायमस्वरूपी आणि प्रभावीपणे वजन कमी करू शकता. संतुलित आहारावर भर द्यावा, नियमित शारीरिक हालचाल गरजेची आहे. पाण्याचे प्रमाण आणि चांगल्या सवयी तसेच पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे.