डायबेटिसपेक्षा 'या' आजाराचं प्रमाण जास्त; महिलांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:19 PM2019-07-24T23:19:59+5:302019-07-24T23:20:18+5:30

गर्भधारणेच्या काळात त्रास होत असल्यानं महिलांनी तपासणी करुन घेणं गरजेचं

Abbott ITS and FOGSI join hands to raise awareness on the importance of thyroid screening in pregnant women | डायबेटिसपेक्षा 'या' आजाराचं प्रमाण जास्त; महिलांना सर्वाधिक धोका

डायबेटिसपेक्षा 'या' आजाराचं प्रमाण जास्त; महिलांना सर्वाधिक धोका

Next

मुंबई: डायबेटिसपेक्षा थायरॉईडच्या विकाराचं प्रमाण जास्त असून महिलांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. विशेष म्हणजे गर्भधारणेच्या काळात महिलांना हायपो-थायरॉइडिझचा त्रास होतो. याचा थेट परिणाम गर्भवतीच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे या समस्येची तीव्रता जास्त आहे आणि त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचसाठी अ‍ॅबॉट, आयटीएस आणि एफओजीएसआय यांनी मिटा (मेक इंडिया थायरॉईड अवेअर) अभियानाची सुरुवात केली आहे. 

थायरॉईडबद्दल जनजागृती व्हावी, अधिकाधिक लोकांनी याबद्दलची आवश्यक चाचणी करावी आणि गरज असल्यास योग्य ते उपचार घ्यावेत, असं आवाहन यावेळी अ‍ॅबॉट, आयटीएस आणि एफओजीएसआयच्या डॉक्टरांनी केलं. यावेळी इंडियन थायरॉईड सोसायटीचे सचिव डॉ. शशांक जोशी यांनी थायरॉईडची समस्या सोप्या शब्दांत समजावून सांगितली. 'घशाजवळ असलेलं थायरॉईड आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवतं. त्यावर परिणाम झाल्यास वारंवार थकवा जाणवतो. यावरील उपचार आता कमी दरात उपलब्ध आहेत. साध्या टॅबलेटनं ही समस्या दूर होऊ शकते. मात्र योग्य वेळी याबद्दलची चाचणी करून घेणं आवश्यक आहे, ' असं जोशी यांनी म्हटलं. 

यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या फेडरेशन ऑफ ओबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजिस्ट सोसायटीज ऑफ इंडियाच्या (फॉग्सी) अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर यांनी या आजाराचा महिलांना असणारा धोका अधोरेखित केला. 'दर तीनपैकी एका महिलेला हा त्रास जाणवतो. गर्भवतींना ही समस्या जाणवत असल्यानं त्याचा परिणाम बाळावर होतो. बाळाच्या नैसर्गिक वाढीवर, बुद्धीवर थेट परिणाम होत असल्यानं याचं गांभीर्य जास्त आहे. कारण यामुळे भविष्यात त्या मुलामुळे संबंधित कुटुंबावर आर्थिक भार पडू शकतो. म्हणून गर्भवती महिलांवर केलेले उपचार म्हणजेच देशाच्या पुढील पिढीवर केलेले उपचार असल्याचं आम्ही समजतो', अशा शब्दांमध्ये डॉ. पालशेतकर यांनी हायपो-थायरॉइडिझमची व्यापकता समजावून सांगितली. 



आयटीएस, फॉग्सी या दोन संस्था अ‍ॅबॉटच्या सहकार्यानं थायरॉईडबद्दलची जनजागृती करत आहेत. या तिन्ही संस्थांनी सुरू केलेल्या मिटा अभियानातील अ‍ॅबॉट इंडिया लिमिटेडची भूमिका मेडिकल डायरेक्टर डॉ. श्रीरुपा दास यांनी स्पष्ट केली. 'मिटा अभियानात अ‍ॅबॉट अंमलबजावणीचं काम करेल. यासाठी ८५०० डॉक्टरांनी शपथ घेतली आहे. देशात दरवर्षी २.६ कोटी बालकं जन्म घेतात. हा आकडा लक्षात घेतल्यास समस्येची व्यापकता लक्षात येऊ शकेल. थायरॉईडची समस्या अतिशय सोप्या पद्धतीनं दूर होते. त्यासाठीचे उपचार फारसे खर्चिक नाहीत. मात्र त्यासाठी वेळीच चाचणी करण्याची आवश्यकता आहे,' असं दास म्हणाल्या.

Web Title: Abbott ITS and FOGSI join hands to raise awareness on the importance of thyroid screening in pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.