जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:01+5:30

गोंदिया जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी पूर्ण झाला होता. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी आरूढ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्कलनिहाय आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली होती; पण पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ही प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती.

Zilla Parishad elections are on | जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजला बिगुल

जिल्हा परिषद निवडणुकांचा वाजला बिगुल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  कोरोनाच्या संसर्गामुळे मागील १६ महिन्यांपासून गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक लांबली होती. दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या घोषणेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.२६) गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 
गोंदिया जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० रोजी पूर्ण झाला होता. त्यापूर्वी निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी आरूढ होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्कलनिहाय आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली होती; पण पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ही प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. 
दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगरपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. तेव्हाच जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने संविधान दिनाचा मुहूर्त साधत गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 
गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण ५३, तर पंचायत समितीच्या एकूण १०६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. नगरपंचायत पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गुलाबी थंडीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. 
भूमिपूजन लोकार्पणाला लागला ब्रेक 
जिल्ह्यात नगरपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे पूर्णपणे ब्रेक लागला आहे. 

दोन्ही निवडणुका एकाच दिवशी
- राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यापाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूकसुध्दा २१ डिसेंबरला जाहीर केली आहे. दोन्ही निवडणुका एकाच दिवशी आल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका एकाच दिवशी नको, असा सूरदेखील आवळला जात आहे. 

सर्वांचाच अंदाज चुकला 
- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्कलनिहाय आरक्षण नुकतेच घोषित करण्यात आले. त्यातच नगरपंचायतच्या निवडणुका लागल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होण्याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांकडून वर्तविला जात होता. मात्र, हा अंदाज चुकल्याने आता सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे. 

सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा कायम 
- मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपसोबत अभद्र युती करून पाच वर्षे सत्ता उपभोगली. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली होती. एकूण ५३ सदस्यीय गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, भाजपचे १७ आणि काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते; पण गल्ली आणि बंगल्याच्या वादात काँग्रेसने कमळ हातात घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. तर यंदा सुरुवातीपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे यंदा काय होते, हेसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

असा आहे जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम

- निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणे : १ डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात : १ डिसेंबर
- उमेदवारी अर्जाची छाननी व उमेदवारांची यादी जाहीर करणे : ७ डिसेंबर
- आक्षेप घेण्याची अंतिम तारीख : १० डिसेंबर
- अपिलावर सुनावणी : १३ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटीची तारीख : १३ डिसेंबर
- निवडणूक चिन्हांचे वाटप करणे : १३ डिसेंबर 
- मतदानाची तारीख : २१ डिसेंबर 
- मतमाेजणी तारीख : २२ डिसेंबर 
- निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे : २८ डिसेंबर 

पाच दिवसात करावी लागणार उमेदवारांची चाचपणी
- नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित आल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १ डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना पाच दिवसांत उमेदवारांची चाचपणी करून यादी जाहीर करावी लागणार आहे. यामुळे त्यांची सुद्धा चांगलीच दमछाक होणार आहे.

 

Web Title: Zilla Parishad elections are on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.