Who will stop the traffic? | अवैध वाहतुकीला लगाम लावणार कोण ?
अवैध वाहतुकीला लगाम लावणार कोण ?

ठळक मुद्देजिल्ह्यातील प्रवाशांचा सवालवाहतूक नियंत्रण विभाग जबाबदारदुर्लक्ष होत असल्याची ओरडअपघातांच्या संख्येत वाढ

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या काळी-पिवळी वाहनाच्या अपघातात सहा जणांना नाहक जीव गमावावा लागला. या अपघातामुळे चार विद्यार्थिनीचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न देखील अधुरेच राहिले.या अपघातानंतर पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अपघात झाला की मोहीम सुरू करुन वाहनांवर कारवाई करायची त्यानंतर वर्षभर मात्र त्याकडे ढुंकुनही पाहयचे नाही.वृत्तीमुळेच जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला उधान आले आहे. काळी-पिवळी आणि अवैध प्रवासी वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड होवू लागली आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांची दळणवळणासाठी गैरसोय होवू नये, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शासनाने काळी-पिवळी वाहनांना प्रवाशी वाहतुकीचा परवाना दिला. ट्रॅक्स, जीप सारख्या वाहनाना ९ अधिक १ तर टाटा मॅजीक सारख्या ४ अधिक १ असा प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला आहे.
जिल्ह्यात २५८ काळी पिवळी व ३३ परवानाधारक टाटा मॅजीक वाहनाची नोंद आहे. प्रत्यक्षात रस्त्यांवरुन यापेक्षा अधिक वाहने धावत आहेत ती बाब मात्र वेगळी आहे. बऱ्याच वाहनांच्या मालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना सुध्दा ती वाहने सुध्दा सर्रासपणे धावत आहे. ही बाब वाहतूक नियंत्रण विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुध्दा माहिती आहे. मात्र यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य करण्याचे कारण नाही. कारण सब कुछ सेट असल्याचे काहीजण बिनाधास्तपणे सांगतात.
त्यामुळे जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला उधान आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने तुम्हाला ९ अधिक १ असा प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला आहे. मग तुम्ही नियमानुसार का प्रवासी वाहतूक करीत नाही असा प्रश्न काही काळी पिवळी चालक आणि मालकांना केला असता त्यांनी ज्या मार्गावर वाहन चालते त्या मार्गावर महिन्याचा हप्ता द्यावा लागतो. शिवाय डिझेल आणि गाडीचा मेटेंनसचा खर्च, वाहन चालकाचा पगार यासाठीचा खर्च भागविणे कठीण होते. त्यामुळेच अतिरिक्त प्रवाशी भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला जेवढे वाहनधारक जबाबदार आहेत तेवढ्याच प्रमाणात हे दोन्ही विभाग सुध्दा जबाबदार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.रस्त्यावरुन धावणाऱ्या यमदूताला नियमांचे लगाम न लावल्यास अपघाताची मालकी मात्र सुरूच राहणार यात कुठलेही दुमत नाही.
जोरदार नेटवर्क
जिल्ह्यातील सर्वच मार्गावर काळी-पिवळी तसेच इतर अवैध प्रवासी वाहने धावत आहे. या वाहन चालकांचे आपसात चांगले ट्युनिंग व नेटवर्क आहे. त्यामुळे कुठल्या मार्गावर वाहतूक नियंत्रण विभाग अथवा आरटीओकडून कारवाई सुरू असल्यास त्या मार्गावरील काळी पिवळी चालक मालकांना बरोबर संदेश पोहचविला जातो. ऐवढे जबरदस्त नेटवर्क त्यांचे तयार झाले आहे.
मोहीम सुरू होणार का?
जिल्ह्यात सर्वत्र अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात उधान आले आहे. विशेष म्हणजे काही वाहने जीर्ण झाली असली तरी ती सुध्दा अद्यापही रस्त्यांवरुन धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून यासर्व गोष्टींची दखल घेवून अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांनावर कारवाही होणार का असा सवाल जिल्हावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

सामाजिक संघटना देणार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा जिल्ह्यात काळी-पिवळी वाहनाच्या अपघातात सहा जणांचा जीव गेल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना जिल्हाधिकाºयांची भेट घेवून त्यांना निवेदन देणार आहेत.
अपघातानंतर वाहने बंद ठेवण्याच्या सूचना
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर कुठेही काळी पिवळी वाहनाचा अपघात झाला की संबंधित विभागातर्फे काळी-पिवळी चालक मालकांना दोन दिवस वाहने घरी उभी करुन ठेवा, वातावरण शांत झाले की पुन्हा वाहतूक सुरू करा अशा सूचना दिल्या जातात.त्यामुळे मंगळवारी भंडारा जिल्ह्यात काळी-पिवळीचा अपघात झाल्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील काळी पिवळी व इतर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने पूर्णपणे रस्त्यांवर गायब झाली होती.


Web Title: Who will stop the traffic?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.