महाराष्ट्राचे मानचिन्ह 'ब्ल्यू मॉर्मोन' फुलपाखरू आढळले अर्जुनी मोरगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:51 AM2021-10-19T10:51:21+5:302021-10-19T10:59:57+5:30

निलवंत नावाच्या फुलपाखराला जून २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने " राज्य फुलपाखरू " म्हणून घोषित केले. अशी फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.

State butterfly found in Arjuni Morgaon | महाराष्ट्राचे मानचिन्ह 'ब्ल्यू मॉर्मोन' फुलपाखरू आढळले अर्जुनी मोरगावात

महाराष्ट्राचे मानचिन्ह 'ब्ल्यू मॉर्मोन' फुलपाखरू आढळले अर्जुनी मोरगावात

Next
ठळक मुद्दे निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल

संतोष बुकावन

गोंदिया : राज्याचे मानचिन्ह असलेले ब्ल्यू मॉर्मोन हे फुलपाखरू अर्जुनी मोरगाव येथे दिसत आहे. निलवंत (ब्ल्यू मॉर्मोन) हे आपले राज्य फुलपाखरू आहे. विदर्भात अत्यंत कमी दिसणारे हे राज्य फुलपाखरू अर्जुनी मोरगाव येथे दिसून येत आहे. येथे हे आकर्षक फुलपाखरू दिसून येत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल व्यक्त केले जात आहे.

फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वपूर्ण घटक व वनस्पतींसह परस्परसंबंध असलेला कीटक आहे. निलवंत नावाच्या फुलपाखराला जून २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने " राज्य फुलपाखरू " म्हणून घोषित केले. अशी फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.

फुलपाखरांच्या जगभरात १७,८२०, भारतात १,५१० तर, महाराष्ट्रात सुमारे २४० ते २५० फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. देशातील १५ टक्के फुलपाखरे महाराष्ट्रात आढळतात. निसर्गात फुलपाखरांची भूमिका महत्त्वाची असते. निलवंत हे फुलपाखरू श्रीलंका तसेच भारतातील महाराष्ट्र, दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. उत्तरेला गुजरातपर्यंत सापडल्याच्या नोंदी आहेत. बऱ्याचदा बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे,बंगलोर या शहरातील वाहतुकीच्या गर्दीत आढळते. '' सदर्न बर्डविंग '' या फुलपाखरानंतरचे हे दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू आहे.

विदर्भात तुरळक प्रमाणात या फुलपाखरांचे अस्तित्व असले तरी विशेषतः सह्याद्री पर्वतरांगा, गडचिरोली, चिखलदरा सारख्या सदाहरित जंगलपट्ट्यात दिसून येतात. मात्र अर्जुनी मोरगाव येथील हौशी निसर्गप्रेमी प्रा. अजय राऊत व डॉ. शरद मेश्राम यांनी हे फुलपाखरू स्थानिक सिव्हिल लाईन व एसएसजे महाविद्यालय परिसरात पाहिले आहे.

ओळख फुलपाखराची

निलवंत फुलपाखरू क्वचितच आढळते. रंग मखमली काळा, पंखाच्या वरच्या भागाला निळसर पट्टे, खालच्या भागाला निळ्या रंगाच्या ठिपक्यांची गर्दी असते. मादीच्या पंखांच्या खालच्या भागाला गर्द लाल रंगाचे पाच ते सात ठिपके, पंखांची खालची बाजू काळ्या रंगाची असते. आपल्या आकर्षक रंगांनी लक्ष वेधून घेणारे हे फुलपाखरू आहे. फुलांच्या मकरंदातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी ही फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात. लिंबूवर्गीय वनस्पती हे त्यांचे आवडते वस्तीस्थान आहे. जंगलातील वाटा व झरे यावरही ते आढळतात. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो. तो सावली टाळतो. अशोक, मोगरा कुलातील फुले, झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देतात.

 -प्रा. अजय राऊत, प्रा. डॉ. शरद मेश्राम

Web Title: State butterfly found in Arjuni Morgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app